साखरवाडी येथे नवीन अपर तहसीलदार कार्यालय सुरू करण्यास मान्यता; फलटण उपविभागीय अधिकाऱ्यांकडून अधिसूचना जाहीर

by Team Satara Today | published on : 23 June 2026


फलटण :  तालुक्यातील साखरवाडी (पिंपळवाडी) येथे नवीन अपर तहसीलदार कार्यालय सुरू करण्यास महसूल व वन विभागाने मान्यता दिली असून, या संदर्भातील प्रारूप अधिसूचनेचा मसुदा फलटणच्या उपविभागीय अधिकारी प्रियांका आंबेकर यांनी प्रसिद्ध केला आहे. या प्रस्तावित कार्यालयाच्या रचनेबाबत नागरिकांकडून हरकती व सूचना मागवण्यात आल्या असून, यामुळे फलटण तालुक्यातील महसूल प्रशासकीय रचनेत मोठे बदल होणार आहेत.

​शासनाच्या महसूल व वन विभाग मंत्रालयाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या निर्णयानुसार, फलटण तालुक्यामध्ये नवीन अपर तहसीलदार कार्यालय साखरवाडी येथे कार्यरत होणार आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम ४ मधील तरतुदींनुसार उपविभागीय अधिकाऱ्यांना प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून ही शासकीय अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या नवीन कार्यालयांतर्गत फलटण तालुक्यातील एकूण १० महसूल मंडळांपैकी होळ, तरडगाव आणि आदर्की बुद्रुक ही तीन महसूल मंडळे साखरवाडी अपर तहसीलदार कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट करण्याचे प्रस्तावित आहे. तर उर्वरित फलटण, कोळकी, बरड, आसू, राजाळे, गिरवी आणि वाठार निंबाळकर ही सात महसूल मंडळे मूळ तहसीलदार कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात कायम राहतील.

​या नवीन प्रशासकीय रचनेमुळे साखरवाडी परिसरातील नागरिकांना विविध शासकीय व महसूल कामांसाठी फलटण शहरात जाण्याची गरज भासणार नाही, ज्यामुळे त्यांचा वेळ आणि श्रम वाचणार आहेत. या जाहीर सूचनेच्या मसुद्याबाबत स्थानिक नागरिकांना अथवा संबंधित व्यक्तींना काही हरकती किंवा सूचना सादर करायच्या असल्यास त्यांनी ७ जुलै २०२६ पूर्वी उपविभागीय अधिकारी कार्यालय फलटण किंवा तहसीलदार कार्यालय फलटण येथे लेखी स्वरूपात सादर कराव्यात, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. प्राप्त झालेल्या हरकतींवर ८ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता उपविभागीय कार्यालयात विचार केला जाणार असून, त्यानंतर अंतिम अहवाल शासनाकडे सादर केला जाईल. ही नोटीस स्थानिक चावडी, ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि तहसील कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्याचे आदेशही जारी करण्यात आले आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
लोणंद बायपासवर कारची काच फोडून महिलेचे मंगळसूत्र व चेन लंपास
पुढील बातमी
पैशांच्या वादातून कुर्‍हाडीने जीवघेणा हल्ला करणार्‍या आरोपीस 1 वर्ष 9 महिन्यांची शिक्षा

संबंधित बातम्या