कराड : कराड तालुका दुष्काळग्रस्त घोषित झाल्याच्या पार्श्वभूमीवर आर्थिक काटकसरीला प्राधान्य देत, आयुक्त तुकाराम मुंढे यांचे व्याख्यान टाऊन हॉलमध्येच घेण्याचा निर्णय कराड नगरपरिषदेने घेतला आहे. यापूर्वी अपेक्षित गर्दी लक्षात घेऊन कृष्णाबाई घाटावरील वाळवंटात व्याख्यान आयोजित करण्याचे नियोजन सुरू होते. मात्र, दुष्काळाच्या परिस्थितीत अनावश्यक खर्च टाळण्याच्या दृष्टीने नियोजनात बदल करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी दिली.
कराड नगरपरिषदेच्या शारदीय व्याख्यानमालेतील सातवे पुष्प गुंफण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे शनिवारी, दि. १७ ऑक्टोबर रोजी कराडमध्ये येत आहेत. सायंकाळी सहा वाजता यशवंतराव चव्हाण स्मृती सदन (टाऊन हॉल) येथे त्यांचे व्याख्यान होणार आहे. मुंढे यांच्या व्याख्यानाबाबत तरुणाईमध्ये उत्सुकता असून, मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
संभाव्य गर्दीचा विचार करून नगरपरिषदेने मुख्य प्रेक्षागृहासह लगतच्या सभागृहात बैठक व्यवस्था करण्याचे नियोजन केले आहे. तसेच टाऊन हॉल परिसरात स्क्रीन लावून बाहेर उपस्थित असलेल्या नागरिकांनाही व्याख्यानाचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे स्थळ न बदलता उपलब्ध जागेचा अधिकाधिक उपयोग करून गर्दीचे व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न नगरपरिषदेकडून केला जाणार आहे.
वाहनांऐवजी पायी येण्याचे आवाहन
व्याख्यानाला येणाऱ्या नागरिकांनी शक्यतो खासगी वाहनांऐवजी पायी येण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन नगराध्यक्ष यादव यांनी केले आहे. दुचाकी वाहनांसाठी साई मंदिरासमोरील प्रवेशद्वारातून विठामाता विद्यालयात, तर चारचाकी वाहनांसाठी शिवाजी विद्यालयात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
नागरिकांनी वाहने टाऊन हॉल परिसरात आणू नयेत, निश्चित केलेल्या पार्किंगच्या ठिकाणीच वाहने लावावीत आणि वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही नगराध्यक्षांनी स्पष्ट केले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर खर्चाला मर्यादा घालत व्याख्यानाचा लाभ अधिकाधिक नागरिकांना मिळावा, यासाठी नगरपरिषदेकडून नियोजन करण्यात येत आहे.
दुष्काळामुळे मुंढेंचे व्याख्यान टाऊन हॉलमध्येच घेण्याचा निर्णय कराड नगरपरिषदेचा निर्णय; अनावश्यक खर्चाला फाटा; गर्दीचे नियोजन, बाहेरही स्क्रीनची व्यवस्था
by Team Satara Today | published on : 15 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा