सातारा : संगम माहुली येथील वेदमूर्ती कुंभारे घराण्याचा इतिहास येथे सापडलेल्या मोडी लिपीच्या कागदपत्रातून उलगडला आहे .या कागदपत्रांवर छत्रपती शाहू महाराज, सवाई माधवराव, दुसरे बाजीराव, आणि श्री परशुराम पंतप्रतिनिधी यांच्या अस्सल राजमुद्रा असून ही कागदपत्रे कुंभारे घराण्याला दिलेल्या इनाम वतनाशी संबंधित आहेत. याची माहिती साताऱ्यातील इतिहास संशोधक सौरभ देशपांडे व कुंभारे घराण्यातील पाचव्या पिढीतील विजय कुंभारे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी डॉ. संदीप श्रोत्री उपस्थित होते.
या कागदपत्रांच्या माध्यमातून ऐतिहासिक दस्तऐवज शोधून ही कागदपत्रे भारत इतिहास संशोधन मंडळाच्या पेशवाईच्या दप्तरात देण्याचा मानस निवृत्त अभियंता विनय कुंभारे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला .विनय कुंभारे हे सध्या अहमदाबाद येथे वास्तव्यास असून ते निवृत्त टेक्स्टाईल इंजिनिअर आहेत. त्यांचे मूळ गाव संगम माहुली असूनं येथील वंशपरंपरेने असणाऱ्या जुन्या वाड्यात सामानाची आवरा आवर करताना त्यांना लाल कापडामध्ये बांधलेला मोडी लिपीतील कागदपत्रांचा गठ्ठा सापडला. त्यांनी त्यांचे मावस बंधू डॉ. संदीप श्रोत्री यांच्याशी संपर्क करून तात्काळ साताऱ्यातील इतिहास संशोधक एड. सौरभ देशपांडे यांना प्राचारण केले. या मोडी लिपीच्या कागदपत्रांमध्ये छत्रपती शाहू महाराज, नानासाहेब पेशवे, सवाई माधवराव, दुसरे बाजीराव व परशुराम त्र्यंबक पंतप्रतिनिधी यांचे अस्सल शिक्के असणारे कागद सापडले आहेत.
इसवी सन 1747 मधील छत्रपती थोरले शाहू महाराज,1796 मधील सवाई माधवराव पेशवे,1799 मध्ये दुसरे बाजीराव पेशवे ,1740 मधील परशुराम त्र्यंबक पंतप्रतिनिधी यांचे अस्सल शिक्के असणारे कागदपत्रे आढळून आली आहेत. ही कागदपत्रे सव्वा तीनशे वर्षांपूर्वीची आहेत व मोडी लिपीतील या मजकुरामध्ये कुंभारे घराण्याचे वेदशास्त्र संपन्न वेंकटाचार्य बाळाचार्य कुंभारे यांना कोडोली करंजे कराड इत्यादी ठिकाणी इनामी जमीन देण्यात आलेल्या होत्या. या इनामांचे नूतनीकरण करताना त्याला मान्यता देणारे ही कागदपत्रे असून इतिहासामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या ऐतिहासिक व्यक्तींच्या राजमुद्रा या कागदपत्रावर दिसून येतात.
कुंभारे घराण्याचा संगम माहुली येथील राहता वाडा तसेच इनाम जमिनी याशिवाय तत्कालीन माहुली गावाची सामाजिक व राजकीय परिस्थिती आणि त्याचे वर्णन या कागदपत्रात आढळून येते .या पत्रातील मजकूर सांगताना सौरभ देशपांडे म्हणाले हे भले सतपात्र वेदशास्त्र संपन्नस्नान संधी षटक करणे निरक्त यांचे चालविली या स्वामीस व स्वामींचे राज्याचे हितकर हे वतन अनुभवून स्वामी व स्वामींच्या राज्यात कल्याण चिंतून असावे असा मोडी लिपीचा मजकूर आहे. म्हणजे सर्व उपचार कार्य करून आपण स्वराज्यात हितकर अशी आपली भूमिका ठेवावी अशी सूचना करून या इनाम वतनाच्या मान्यतेला छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या राजमुद्रेने अंकित केले आहे. या कागदपत्रांमध्ये इनाम वतनाच्या शेवटी शाहू महाराजांचे हस्ताक्षर आहे. यामध्ये जाणिजे लेखनालंकार ही अक्षरे खुद्द शाहू महाराजांच्या हातची आहेत. वेदसंपन्न कुंभारे यांच्या घराण्याचा इतिहास आणि माहुली परिसराचे ऐतिहासिक महत्त्व या कागदपत्रातून उलगडते आणि त्या गावच्या इतिहासावर मोठा प्रकाश पडतो असे सौरभ देशपांडे यांनी बोलताना स्पष्ट केले.