खंडाळा : 'यशवंतराव पंचायतराज अभियान ' या स्पर्धेसाठी खंडाळा पंचायत समितीने विभाग स्तरावर तृतीय क्रमांकावर बाजी मारली आहे. यामुळे खंडाळा पंचायत समितीला सहा लाखाची बक्षीस प्राप्त झाले असून, या मिळवलेल्या यशाबद्दल सर्वत्र या खंडाळा पंचायतीचे कौतुक होत आहे.
नुकत्याच झालेल्या विभागस्तर तपासणीत १७९. ३८ गुण मिळवून या पंचायत समितीने कोल्हापुर विभागात तृतीय क्रमांक पटकावला आहे. यासाठी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, तालुक्यातील पदाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास शिद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले यांचे मार्गदर्शन लाभले असल्याचे गटविकास अधिकारी अनिल वाघमारे यांनी सांगितले.
या स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम तर विभागात तृतीय क्रमांक मिळविण्यासाठी गटविकास अधिकारी अनिल वाघमारे, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रकाश बोंबले,गजानन आडे (शिक्षण ),छाया मगदुम (बालविकास ), अविनाश पाटील (अरोग्य ), दर्शन काकडे (पशुसंवर्धन), विद्याधर शिंदे ( बांधकाम ) संजय लाड (पाणीपुरवठा ),भारत बोडरे (कृषी) हे विभागप्रमुख व कर्मचारी यांनी मेहनत घेतली.
समृध्द ग्राम, संपन्न ग्रामस्थांची संकल्पना प्रत्यक्षात आणताना संस्थांनी केलेली कामगिरी लक्षात घेऊन व त्यांच्यामध्ये स्पर्धेचे वातावरण तयार करून अत्युत्कृष्ट काम करणाऱ्या पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदा या पंचायत राज संस्थांना आणि त्यातील गुणवंत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यसंस्कृतीचा सन्मान करण्यासाठी 'यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान 'राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने "यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान" योजनेअंतर्गत पंचायत समित्या व जिल्हा परिषदांना पुरस्कार प्रदान करण्यात येतात.
पंचायत राज संस्थांकडून प्रशासकीय व्यवस्थापन विकास कार्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्ह्यातील खंडाळा पंचायत समितीला यशवंतराव चव्हाण पंचायतराज अभियान हा पुरस्कार घोषित झाला आहे. महिला सबलीकरण, शेतीचे उत्पन्न वाढवणे, बांबू लागवड, शिष्यवृत्ती यासह विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केल्याने पंचायत समितीने हे यश मिळवले आहे. - याशनी नागराजन - मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद )