सातारा : प्रयोगशील लेखक, वाईतील प्राज्ञ पाठ शाळा मंडळाचे विश्वस्त, लोकमान्य टिळक स्मारक संस्थेचे अध्यक्ष, प्रख्यात स्त्री रोग तज्ञ डॉ. शंतनू शरद अभ्यंकर (वय 60) यांचे कर्करोगाने निधन झाले.
त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी, भाऊ, एक, मुलगा एक विवाहित मुलगी असा परिवार आहे.
सातार्यातील वाई व जिल्ह्यातील प्रख्यात स्त्री रोगतज्ञ, अत्यंत चांगले डॉक्टर, प्रतिभावान लेखक व वक्ता, नाटककार, तीव्र सामाजिक जाणीव असलेले विज्ञानवादी असा लोकविज्ञान चळवळीतला कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती. पुणे येथील बी जे वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र या विषयात एमडी पदवी संपादन केली होती. 1997 पासून ते मॉडर्न क्लिनिक या व्यवसायात कार्यरत होते.
अनेक राष्ट्रीय मंच आणि परिषदांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर आपले विचार स्पष्टपणे व्यक्त केले होते. स्त्रीआरोग्य तज्ज्ञांच्या राष्ट्रीय काम विज्ञान समितीचे ते सचिव होते. ते वाई येथील प्राज्ञपाठशाळा मंडळाचे विश्वस्त होते. तेथील अनेक प्रकल्पांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. लोकमान्य टिळक स्मारक संस्थेचे ते अध्यक्ष होते. वसंत व्याख्यानमालेचे माजी अध्यक्ष, प्रतीक थिएटर चे ते माजी अध्यक्ष होते.
आधुनिक वैद्यकीची शोधगाथा, शास्त्रज्ञ आजीच्या गोष्टी, डॉ क्युटरस, राधिका सांत्वनमहे या त्यांच्या चार पुस्तकांचे एकत्रित प्रकाशन नुकतेच दि. 14 जुलै रोजी पुण्यातील पत्रकार भवन येथे झाले होते. जादुई वास्तव्य, रिचर्ड डॉकिंस, मला शास्त्रज्ञ व्हायचंय, बायकात पुरुष लांबोडा, डॉक्टरांना भेटलेल्या खुमासदार माणसांबद्दल, डॉक्टर टेरेसा आणि इतर वल्ली, आधुनिक वैद्यकीची शोधगाथा आदी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. ब्लॉग लेखक, वक्ते, कथाकार, लेखक, नाटककार, अनुवादक म्हणूनही त्यांची ओळख होती. 2007 मध्ये डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. मराठी भाषेला कोणतेही ग्रहण लागणार नाही आणि लागणारही नाही, ती सतत उंच भाषा होत राहणार आहे, असे त्यांचे मत होते.
मराठीतही तांत्रिक विषय मांडता येणे शक्य आहे, असे ते म्हणत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ते कार्यकर्ते होते. त्यांना आजाराचे निदान झाल्यानंतर ताकदीने मागील दोन वर्ष त्यांनी असाध्य आजाराला खंबीरपणे तोंड दिले. मागील पंधरा दिवसांपासून पुण्यातील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. दुपारी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी गर्दी झाली होती. रात्री उशिरा कृष्णातिरी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्व स्तरातील लोक उपस्थित होते.
प्रख्यात डॉ. शंतनू अभ्यंकर यांचे निधन
by Team Satara Today | published on : 16 August 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा