सातारा: येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या बजाज जनरल इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयात घुसून अधिकार्यांना धमकी दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चार नामदशित व्यक्तींसह दोन अज्ञातांविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बजाज जनरल इन्शुरन्सचे रिजनल हेड निलेश सोपानराव कदम यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, संशयित आरोपी दीपक नारायण चव्हाण, नारायण चव्हाण (दोघे रा. शेंद्रे, सातारा), विशाल कोळी, प्रशांत पिलावरे आणि इतर दोन अज्ञात व्यक्तींनी सदरबझार परिसरातील कंपनीच्या कार्यालयात बेकायदेशीररीत्या प्रवेश केला. त्यानंतर आरोपींनी कार्यालयाचा दरवाजा आतून बंद करून फिर्यादी कदम यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणात एकूण सहा जणांचा समावेश असून, सातारा शहर पोलिसांनी त्यांच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेमुळे शहराच्या मध्यवर्ती भागात काही काळ खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार भोंडवे करत आहेत.