पळशी : चिमणगाव (ता. कोरेगाव) येथे मंगळवारी दुपारी महावितरणच्या वीज वाहिन्यांमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे लमाण वस्तीमध्ये आग लागली. या आगीत वस्तीतील मजुरांच्या 16 झोपड्या जळून खाक झाल्या; तर बाजूच्या शेतकर्यांची सुमारे 5 लाख रुपयांची वैरणही जळाली. ग्रामपंचायतीचा पाण्याचा टँकर आणि जरंडेश्वर शुगर मिलच्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली.
चिमणगाव येथे उमेश राठोड हे गेल्या 25 वर्षांपासून मोलमजुरीचे काम करत आहेत. त्यांनी आपल्या राज्यातून सोळा कुटुंबे शेती व अन्य कामासाठी चिमणगाव येथे आणले आहेत. या कुटुंबांतील 40 ते 50 लोक लमाण वस्तीत 16 झोपड्यांमध्ये राहतात. मंगळवारी सकाळी शेतातील ज्वारी काढण्यासाठी लमाण वस्तीतील सर्व मजूर घरे बंद करून गेले होते. दुपारी एकच्या सुमारास महावितरणच्या वीज वाहिन्यांमध्ये शॉर्टसर्किट झाले. त्यातून या वस्तीला आग लागली आणि सर्व घरे जळून खाक झाली. घराजवळ उभ्या असलेल्या दुचाकीही आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. या परिसरात शेतकरी दत्तात्रय भगत, अक्षय जाधव, अमित भगत, रमेश भगत, संजय भगत यांची वैरणही खाक झाली.
या आगीत लमाण वस्तीतील सर्व कुटुंबीयांची घरे पूर्णपणे जळाली आहेत. यामध्ये कुटुंबिय व शेतकर्यांचे सुमारे 35 लाखांचे नुकसान झाले आहे. ग्रामपंचायत व जरंडेश्वर कारखान्याच्या अग्निशामक बंबाद्वारे आग आटोक्यात आणली.