सातारा : सातारा नगरपालिकेसमोर गुरुवार, दि. 20 रोजी सायंकाळी धक्कादायक घटना घडली. अल्पवयीन युवक भरधाव वेगाने कार चालवत येत असताना त्याने एकाच फटक्यात चार ते पाच वाहनांना जोरदार धडक दिली. धडक बसलेल्या वाहनांमध्ये निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची खासगी गाडीही समाविष्ट आहे. या अपघाताची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सातारा शहराच्या उपनगरातील संभाजीनगर येथील राहणार्या अल्पवयीन मुलाने वेगावर नियंत्रण गमावत त्याच्या ताब्यातील वाहनाला नगरपालिकेसमोरच असलेल्या पार्किंग आणि रस्त्यावरील वाहनांत घुसवले. ही धडक इतकी जोरदार होती की, परिसरात काही क्षणात गोंधळ उडाला व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. यात एकूण चार ते पाच वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातातील अजून एकाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असुन त्याला श्वास घेणेही मुश्किल होवू लागले आहे.
या अपघातात युवकाच्या छातीला गंभीर दुखापत झाली असून त्याला तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पाहणी करणार्या नागरिकांनी सांगितले की, गाडीचा वेग अतिशय प्रचंड होता. या अपघातानंतर अल्पवयीन युवकाच्या वडिलांना तातडीने पोलीस ठाण्यात बोलावून घेण्यात आले. घटनेची माहिती मिळताच सातारा शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. नुकसानग्रस्त कार पोलिसांनी ताब्यात घेतली असून रात्री उशिरा सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अल्पवयीन चालकावर कारवाईची मागणी
या अपघातामुळे पुन्हा एकदा शहरात अल्पवयिनांकडील वाहनचालकांवर नियंत्रणाची गरज अधोरेखित झाली आहे. नगरपालिकेसमोरील संवेदनशील क्षेत्रात भरधाव वेगाने गाडी चालवण्याने नागरिकांमध्ये संताप पसरला आहे. यानुषंगाने संबंधितावर कठोर कारवाईची मागणी होत आहे.