दिल्ली : हॉर्मुझ सामुद्रधुनीजवळ मालवाहू जहाजावर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात पुण्यातील मरीन इंजिनिअर हेरंब करमरकर यांचा मृत्यू झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या सुरक्षिततेबाबत माहिती मिळत नव्हती. अखेर संबंधित अधिकाऱ्यांनी हेरंब यांचा मृत्यू झाल्याचे कुटुंबीयांना कळवले.
हेरंब करमरकर हे MV GFS Galaxy या सायप्रस ध्वजाखालील कंटेनर जहाजावर थर्ड इंजिनिअर (Third Engineer) म्हणून कार्यरत होते. रविवारी पहाटे जहाज ओमानच्या सागरी हद्दीजवळून हॉर्मुझ सामुद्रधुनी पार करत असताना त्यावर क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला.
रविवारी पहाटे सुमारे 3.30 वाजण्याच्या सुमारास जहाजावर क्षेपणास्त्र आदळले. या हल्ल्यामुळे जहाजाच्या इंजिन रूममध्ये भीषण आग लागली आणि जहाजाची यंत्रणा पूर्णपणे बंद पडली. जहाजावरील कर्मचाऱ्यांनी लाइफबोटच्या मदतीने बाहेर पडण्यास सुरुवात केली. जहाजावर एकूण 24 कर्मचारी होते. त्यापैकी 11 जण भारतीय होते. ओमानच्या रॉयल नेव्हीने 23 कर्मचाऱ्यांची सुटका केली. मात्र, इंजिन रूमजवळ काम करत असल्याने हेरंब करमरकर बेपत्ता झाले होते.
हल्ल्याच्या अगोदर, रविवारी पहाटे 2.49 वाजता (IST) हेरंब यांनी आपल्या कुटुंबीयांशी शेवटचा संपर्क साधला होता. त्यांनी आपण सुरक्षितपणे हॉर्मुझ सामुद्रधुनी पार केल्याचे सांगितले होते. त्या फोननंतर काही मिनिटांतच जहाजावर हल्ला झाला आणि त्यानंतर हेरंब यांच्याशी संपर्क तुटला. हेरंब करमरकर हे पुण्यातील रहिवासी आणि व्यवसायाने मरीन इंजिनिअर होते. ते व्यापारी मालवाहू जहाजांवर थर्ड इंजिनिअर म्हणून कार्यरत होते. समुद्रातील प्रवासात ते तीन महिन्यांहून अधिक काळ होते आणि लवकरच ते सुट्टीसाठी भारतात परतणार होते.