पुणे पदवीधर मतदारसंघासाठी रोहित राऊत यांची उमेदवारी; अखिल भारतीय विद्यार्थी व पदवीधर विकास मंचाचा निर्णय; विद्यार्थी, युवा व पदवीधरांच्या प्रश्नांसाठी काम करण्याचा निर्धार

by Team Satara Today | published on : 29 September 2026


सातारा : विद्यार्थी, युवक आणि पदवीधरांच्या प्रश्नांसाठी कार्यरत असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी व पदवीधर विकास मंच, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने पुणे पदवीधर मतदारसंघासाठी रोहित अनिल राऊत यांची मंचाचे अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सातारा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
विद्यार्थी संघटनात्मक कार्यापासून विद्यापीठ आणि पदवीधर क्षेत्रातील कामाचा दीर्घ अनुभव, तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये केलेले संघटनात्मक कार्य आणि पदवीधर मतदारसंघाशी संबंधित प्रत्यक्ष निवडणूक नियोजनाचा अनुभव या पार्श्वभूमीवर रोहित राऊत यांची उमेदवारी जाहीर करण्यात आल्याचे मंचाने म्हटले आहे.
रोहित राऊत यांनी सन २०२२ पासून विद्यार्थी क्षेत्रात सक्रियपणे काम केले असून, पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विविध जिल्हे व विभागांमध्ये संघटनात्मक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. विद्यार्थी परिषदेत सुमारे चार वर्षे पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करताना त्यांनी विविध जिल्ह्यांमध्ये संघटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडल्याचा उल्लेख त्यांच्या प्रसिद्धीपत्रकात करण्यात आला आहे. तसेच विद्यापीठातील विविध पदांवर काम करताना विद्यार्थी प्रश्नांशी संबंधित विषयांवर त्यांनी सहभाग नोंदविला आहे.
सन २०२३ ते २०२६ या कालावधीत विद्यापीठ विकास मंच, महाराष्ट्राचे महाराष्ट्र प्रदेश संयोजक म्हणून त्यांनी काम केले. या काळात महाराष्ट्रातील २३ पैकी ९ शासकीय विद्यापीठांच्या सिनेट निवडणुकांशी संबंधित संघटनात्मक कामाचा अनुभव त्यांना मिळाल्याचे मंचाने नमूद केले आहे. पदवीधर मतदार नोंदणी, गावोगावी कार्यकर्त्यांची जोडणी, पदवीधर मेळावे, मतदार संपर्क तसेच मतदार केंद्रनिहाय नियोजन आणि पदवीधर मतदारांच्या संघटनात्मक नियोजनात त्यांनी काम केले.
पुणे विद्यापीठासह शिवाजी विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, गोंडवाना विद्यापीठ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाशी संबंधित कामाचा अनुभव असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
शैक्षणिक प्रश्न, उच्च शिक्षण, रोजगार, शिक्षक भरती, स्पर्धा परीक्षा, कौशल्यविकास आणि पदवीधरांच्या विविध प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करण्याचा आपला प्रयत्न राहील, असे राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन केंद्रे तसेच विविध सामाजिक उपक्रमांमध्येही त्यांनी सहभाग घेतला आहे.
“पदवीधरांचा प्रश्न केवळ निवडणुकीपुरता मर्यादित न राहता सातत्याने मांडला आणि त्याचा पाठपुरावा केला पाहिजे,” या भूमिकेतून पुणे पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आगामी काळात पदवीधर मतदारसंघातील पदवीधरांशी संवाद साधून त्यांच्या अपेक्षा, समस्या आणि प्रमुख प्रश्न जाणून घेण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्हा बँकेच्या आखाड्यात पहिली चाचपणी; २७ अर्जांनी राजकीय गणिताला वेग; २१ उमेदवारी नोंदी; उदयनराजेंच्या प्रवेशाने गृहनिर्माण-दूध मतदारसंघ चर्चेत
पुढील बातमी
१ ऑक्टोबर रोजी जिल्हाभर एक तास सामुहिक श्रमदान : याशनी नागराजन, महास्वच्छता अभियानात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन

संबंधित बातम्या