'अपहरण नाट्या'मध्ये निलंबन प्रस्तावामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी असलेले पोलीस अधीक्षक तुषार दोशी अर्जित रजेवर

​जिल्हा पोलीस दलाचा कार्यभार अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्याकडे

by Team Satara Today | published on : 30 March 2026


​सातारा  : सातारा जिल्हा परिषदेच्या 'अपहरण नाट्या'मध्ये निलंबन प्रस्तावामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी असलेले साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी हे अचानक रजेवर गेल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ते सक्तीच्या रजेवर गेल्याने हे प्रकरण अखेर त्यांना भोवल्याची चर्चा सुरू झाली असली, तरी प्रत्यक्षात ६ एप्रिलपर्यंत त्यांनी 'अर्जित रजा' घेतल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. त्यांच्या अनुपस्थितीत सातारा जिल्हा पोलीस दलाचा अतिरिक्त कार्यभार अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

​सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीमध्ये भाजपने पोलीस बळाचा वापर करून राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्यांना अटक करण्यास भाग पाडले, असा आरोप झाला होता. या गोंधळामुळे महाविकास आघाडीचे संख्याबळ कमी पडले आणि भाजपची सत्ता आली. या प्रकरणाचे थेट पडसाद विधान परिषदेत उमटले आणि सातारा पोलिसांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका झाली. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना निलंबित करण्याचे आदेश दिले होते, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाची कार्यकारी समिती या प्रकरणाची चौकशी करेल असे सांगून तेव्हा त्यांचा बचाव केला होता.

​या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी तुषार दोशी हे अचानक रजेवर गेल्याने ही 'सक्तीची रजा' असल्याची चर्चा रंगली आहे. वरिष्ठ पातळीवरून म्हणजेच पोलीस महासंचालकांकडून या प्रकरणाची राजकीय हवा जाईपर्यंत त्यांना रजेवर पाठवण्यात आल्याचे बोलले जात आहे. पुणे येथील वैद्यकीय चाचणी सत्र पार पाडल्यानंतर दोशी पुन्हा कामावर हजर झाले होते आणि त्यांनी पालकमंत्र्यांसमवेत काही बैठकांना उपस्थितीही लावली होती. मात्र, अचानक रजा घेतल्याने त्याचा संबंध जिल्हा परिषदेतील राजकीय राड्याशी जोडला जात आहे. दरम्यान, सातारा पोलीस दलाने या चर्चांचे खंडन केले असून अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. या परिपत्रकानुसार, पोलीस अधीक्षक तुषार दोशी हे ६ एप्रिलपर्यंत अर्जित रजेवर असून तोपर्यंत डॉ. वैशाली कडूकर जिल्ह्याचा पदभार सांभाळणार आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
देहरादूनमध्ये ओव्हरटेकच्या वादातून गोळीबार; मॉर्निंग वॉकला गेलेल्या निवृत्त ब्रिगेडियरचा मृत्यू
पुढील बातमी
वाई तालुक्यातील आसले, खंडाळा तालुक्यातील मोर्वे येथे वीज पडून २५ मेंढ्या ठार; मेंढपाळ जखमी

संबंधित बातम्या