दिल्ली : पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर सुरू असलेल्या आंदोलनाच्या दरम्यान लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली कॉकरोच जनता पार्टीने सुरू केलेल्या आंदोलनाची धग कायम असतानाच दिल्लीतील पंतप्रधान निवासस्थानाजवळ काँग्रेसने धरणे आंदोलन सुरू केले. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या खासदारांनी आणि कार्यकर्त्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानापर्यंत मोर्चा काढला. त्यानंतर रस्त्यावर ठिय्या देत आंदोलनाला सुरुवात केली.
संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. विरोधक संसदेत आणि संसदेबाहेरही आक्रमक झाले. लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज प्रचंड गोंधळामुळे तहकूब करण्यात आल्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या खासदारांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले. याची माहिती मिळताच केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह हे तातडीने आंदोलन स्थळी आले आणि त्यांनी राहुल गांधींची भेट घेतली.
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हीच प्रमुख मागणी
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या प्रमुख मागणीसाठी लोककल्याण मार्गावरील आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे याही राहुल गांधी, प्रियांका गांधी वॉड्रा, केसी वेणुगोपाल, केरळचे मुख्यमंत्री व्हीडी सठेसन आणि इतर काँग्रेस नेत्यांमध्येही सामील झाल्या आणि आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतल्यानंतर सदर भाग मोकळा करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, एकीकडे काँग्रेसचा ठिय्या सुरू असताना, शरद पवार यांनी जंतर मंतर येथे आंदोलन करत असलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. शरद पवार यांनी अभिजीत दीपके याच्यासोबत चर्चा केली. काल झालेल्या लाठी हल्ल्यात जखमी झालेल्यांचीही त्यांनी चौकशी केली.