कराड : राज्यात नवीन उद्योगधंदे यायला इच्छुक असून, त्या उद्योगांमध्ये कुशल मनुष्यबळ उपलब्धीसाठी राज्यात स्वतंत्रपणे मुख्यमंत्री रोजगार प्रशिक्षण विभाग सुरू करण्याची आवश्यकता आहे. त्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असून, त्याबाबत सकारात्मकता दर्शविल्याची माहिती आमदार डॉ. अतुल भोसले यांनी विधानसभेत आज दिली. राज्यपालांच्या अभिभाषणावरील अभिनंदन ठरावावर ते बोलत होते.
आमदार डॉ. भोसले म्हणाले, ‘‘कुशल मनुष्यबळाच्या निर्मितीसाठी मुख्यमंत्री रोजगार प्रशिक्षण विभाग स्थापन करण्यास मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मकता दर्शविली आहे. त्या विभागात कामगार सचिव, कौशल्य विकास विभागाचे सचिव, लोकप्रतिनिधी आणि उद्योग क्षेत्रातील लोकांचा समावेश असावा. मी काही लोकांशी चर्चा केली. देशातील अनेक तरुणांना काही कारणांनी उद्योगाची किंवा नोकरीची संधी मिळत नाही.
नेहमी बेरोजगारीवर चर्चा करतो; पण विभाग विकसित केला, तर आपल्या मनुष्यबळाची निर्मिती करता येईल. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या विभागाची लवकरात लवकर स्थापना करावी.’’ ते म्हणाले, ‘‘त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक वाढत आहे. दावोसच्या आर्थिक परिषदेमध्ये १५ लाख ५० हजार कोटी, सामंजस्य करार राज्याने अनेक उद्योजकांबरोबर केले. त्यानुसार गुंतवणूक झाली, तर १० लाख लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
एमआयडीसीने १० हजार एकर जमीन सुधारित करण्याचा निर्णय घेतला आहे. ऊर्जा क्षेत्रात सामंजस्य करार सरकारच्या माध्यमातून झाले आहेत. त्यातून महाराष्ट्र गुंतवणूक वाढणार आहे. ५५ हजार ९०० मेगावॉट ऊर्जेची निर्मिती सामंजस्य कराराला कार्यान्वित केल्यानंतर होणार आहे. त्यातून दोन लाख ५५ हजार कोटींची गुंतवणूकदेखील राज्यात होणार आहे. कराड तालुक्याला महसूल कॉम्प्लेक्स निर्माण करण्याची मागणी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे. त्यांनी लागेल तेवढा निधी देऊ, अशी ग्वाही दिली आहे.