सातारा जिल्ह्यात पावसाचा पुन्हा जोर; नवजाला ८६ मिलिमीटरची नोंद, कोयनेत २५५६ क्युसेक आवक

by Team Satara Today | published on : 01 July 2026


सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर पुन्हा वाढला असून २४ तासांत नवजा येथे ८६ मिलिमीटरची नोंद झाली आहे. तर कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाला सुरुवात झाल्याने २ हजार ५५६ क्युसेक वेगाने पाणीधरणात येत आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा वाढून १४.२४ टीएमसी झाला आहे. तसेच जिल्ह्यात अनेक भागात पाऊस होत असल्याने खरीप हंगाम पेरणीला गती मिळू शकते.

जिल्ह्यात मागील आठवड्यापासून मान्सूनचा पाऊस सक्रिय झाला. त्यामुळे मागील सोमवार आणि मंगळवारी पश्चिम भागातील कास, बामणोली, तापोळा, महाबळेश्वर, नवजा आणि कोयना खोऱ्यातही धुवाधार पाऊस पडला. पाटण तालुक्यातील पाथरपूंज येथेही विक्रमी पावसाची नोंद झाली. तर सातारा शहरासह जिल्ह्यातील काही भागातही पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे मान्सूनचा पाऊस शेती क्षेत्राला गती देणार असे स्पष्ट झाले.

पण, नंतर तीन दिवस पावसाची उघडीप होती. दिवसभर ढगाळ वातावरण तयार व्हायचे. सातारा शहरातही पावसाची उघडीप राहिली. मात्र, रविवारपासून पुन्हा पाऊस सक्रिय झालेला आहे. यामुळे अनेक भागात समाधानकारक पाऊस पडू लागला आहे.

पश्चिम भागात कोयना, महाबळेश्वर आणि नवजा परिसरात रविवारी दुपारपर्यंत पाऊस झाला नव्हता. मात्र, सायंकाळनंतर एकसारखा पाऊस कोसळू लागला. यामुळे ओढे, नाले वाहू लागले. तसेच भात खाचरातही पाणी साठले. खटाव आणि माण तालुक्याच्या काही भागात दमदार पाऊस झाला आहे. यामुळे खरीप हंगाम पेरणीच्या कामाला गती येणार आहे. तसेच काही भागातील जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आंबेनळी घाटात मोठी दरड कोसळली; वाहतूक तात्पुरती बंद; परिस्थितीचा आढावा घेऊनच वाहतूक पुन्हा सुरू करण्यात येणार
पुढील बातमी
'कोयने'च्या गाळात आढळली ‘ढोकरा’ शैलीतील गणेशमूर्ती; इतिहासप्रेमी आणि ग्रामस्थांमध्ये कुतूहलाचा विषय

संबंधित बातम्या