दूध उत्पादन वाढीसाठी भ्रूण प्रत्यारोपण योजनेद्वारे वासरांची निर्मिती !

जिल्हा परिषदेचा पुढाकार : नाविण्यपूर्ण योजना; दुग्ध व्यावसायिकांना फायदा

by Team Satara Today | published on : 13 August 2025


सातारा : सातारा जिल्ह्यात दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातर्फे भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान’द्वारे कमी उत्पादन देणार्‍या जनावरांपासून उच्च उत्पादन क्षमतेची वासरे जन्माला घालण्यात येणार आहेत. यामुळे दुधाळ जनावरांच्या जाती सुधारण्यास व दूध व्यावसायिकांना अधिक उत्पादन मिळण्यास मदत होणार आहे. सातारा जिल्हा परिषदेची ही नाविण्यपूर्ण योजना असून, राज्यातही प्रथमच राबविली जात आहे.
देशातील गावठी गाय सरासरी 2.87 किलो प्रतिदिन दूध देते. देशी गाय 4.17 किलो, तर संकरित गाय 6.76 किलो प्रतिदिन दूध देत असते. या तुलनेत विदेशी गाय सरासरी 11.42 किलो दूध देते. पण, हेच प्रमाण इतर विकसित देशात सरासरी 24 किलोपेक्षा अधिक आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे आपल्या देशातील जनावरांची कमी असलेली उत्पादन क्षमता. तसेच वंध्यत्व व इतर प्रजनन अकार्यक्षमतेमुळे दोन वेतातील वाढलेले अंतर आहे. यावर मात करण्यासाठी आणि दूध उत्पादन वाढविण्यासाठी सातारा जिल्ह्यात पात्र जनावरांची निवड करून त्यांच्यावर भ्रूण प्रत्यारोपण प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्यावतीने ही योजना राबविण्यात येणार आहे.
या योजनेंतर्गत दाता गाय/म्हैस यांची निवड शुद्ध संगोपन, रोग प्रतिकारशक्ती, दुधाळ कालावधी व उत्पादन क्षमतेच्या निकषांवर होणार आहे. निवडलेल्या गर्भवती जनावरांत 90 टक्के मादी वासरे जन्माला घालण्यासाठी तंत्राचा वापर केला जाणार आहे. या प्रक्रियेसाठी एकूण खर्च 21 हजार असून, लाभार्थ्यांना 90 टक्के अनुदान मिळेल. लाभार्थ्यांना केवळ 2 हजार इतकाच खर्च येणार आहे. ही योजना दूध उत्पादन वाढीसाठी फायदेशीर ठरेल, अशीच अपेक्षा व्यक्त होत आहे.

सातारा जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पशुपालकांसाठी विविध नाविण्यपूर्ण योजना राबविल्या जातात. मागीलवर्षी 90 टक्के मादी वासरे जन्माला घालण्यासाठी योजना राबविण्यात आली होती. आताच्या 2025-26 वर्षात जिल्हा परिषद सेस निधीमधून प्रायोगिक तत्त्वावर भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा वापर करून उच्च उत्पादन क्षमता असणार्‍या कालवडीची पैदास करण्यात येणार आहे.
- याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी


सातारा जिल्ह्यात दूध उत्पादन वाढविण्यासाठी उच्च उत्पादन क्षमता असणार्‍या कालवडीची पैदास करण्यासाठी शेतकर्‍यांच्या गोठ्यावर जाऊन भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील इच्छुक शेतकर्‍यांची या योजनेचा लाभ घ्यावा.
- डॉ. विनोद पवार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी

ठराव समितीत विविध विषय मंजूर...
जिल्हा परिषदेच्या ठराव समितीची सभा मंगळवारी सकाळी स्थायी समिती सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी कृषी, पशुसंवर्धन, बांधकाम, आरोग्य आदी विभागांतील विविध विषयांना मंजुरी देण्यात आली. तसेच, ऐनवेळच्या विषयांवरही चर्चा झाली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
चहा प्यायल्याने किडनी स्टोन होतो किडनीवरचा वाढतो ताण?
पुढील बातमी
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला 125.19 कोटीचा नफा

संबंधित बातम्या