कराड : मिरजेकडून पुण्याकडे जाणाऱ्या कोल्हापूर-पुणे सह्याद्री एक्सप्रेसवर कराड तालुक्यातील शेणोली रेल्वे स्थानकाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास दरोडा पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत जाणीवपूर्वक बिघाड घडवून गाडी थांबवली आणि खिडकीतून प्रवाशांचे दागिने व मोबाईल लंपास केले. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मिना उमापती या त्यांचे भाऊ मनश्शे इट्टे व आईसह मिरज येथून पुण्याकडे प्रवासाला निघाल्या होत्या. त्यांच्यासोबत रंजन दयानिधी साहु हे देखील सहप्रवासी म्हणून डब्यात होते. मध्यरात्री सव्वादोन वाजण्याच्या सुमारास दोन ते चार अज्ञात व्यक्तींनी शेणोली रेल्वे स्टेशनच्या सिग्नलवर लाल कपडा टाकला. सिग्नल लाल झाल्यामुळे रेल्वे चालकाने गाडी शेणोली स्थानकाच्या मिरज बाजूकडील आऊटर सिग्नलला थांबवली. गाडी थांबताच अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी डब्यांच्या खिडकीतून हात घालून प्रवाशांची लूट करण्यास सुरुवात केली.
या लुटीमध्ये मिना उमापती आणि त्यांच्या सहप्रवासी आशा नारायण पवार यांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळ्या चोरट्यांनी हिसकावून नेल्या. त्याचवेळी रंजन दयानिधी साहु यांचा मोबाईल फोनही खिडकीतून खेचून नेण्यात आला. अचानक सिग्नल बंद झाल्यामुळे रेल्वेची तांत्रिक यंत्रणा सतर्क झाली आणि शेणोली स्थानकातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ मिरज व कराड रेल्वे प्रशासनाला याची कल्पना दिली. तांत्रिक बिघाड दुरुस्त करून रेल्वे मार्गस्थ करण्यात आली असली तरी, या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेचे गांभीर्य ओळखून लोहमार्ग पोलीस अधीक्षक अश्विनी सानप आणि सोलापूरचे पोलीस अधिकारी रवींद्र गायकवाड यांच्यासह मिरज लोहमार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी मिरज रेल्वे पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक फौजदार मुर्ढे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. चोरट्यांच्या शोधासाठी पोलिसांनी पथके रवाना केली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि संशयितांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.