वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाशी माझा दुरान्वये संबंध नाही : अजित पवार

by Team Satara Today | published on : 22 May 2025


मुंबई : महाराष्ट्रामध्ये सध्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावरुन राजकारण तापलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाप्रमुखाची सून असलेल्या वैष्णवीने सहा दिवसांपूर्वी आत्महत्या केली. हुंड्याची मागणी आणि सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाला कंटाळून वैष्णवीने आयुष्य संपलं. 9 महिन्यांचं मूल मागे ठेऊन वैष्णवीने जगाचा निरोप घेतला. या प्रकरणामध्ये वैष्णवीचे सासरे म्हणजेच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे फरार आहेत. तर हगवणे कुटुंबातील अन्य तिघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणावरुन अजित पवार आणि त्यांच्या पक्षावर टीकेची झोड उठलेली असतानाच अजित पवारांनी या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. 

अजित पवारांनी आज या प्रकरणावर प्रतिक्रिया नोंदवण्याआधीच त्यांच्या पक्षाच्यावतीने प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी या प्रकरणावर भाष्य करताना फरार राजेंद्र हगवणेंशी आमच्या पक्षाचा काहीही संबंध नसल्याचं म्हटलं आहे. "मुळशीच्या हगवणे कुटुंबाचा राष्ट्रवादीशी सध्या कोणताही संबंध नाही. राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही पदावर नियुक्त नव्हते," असं तटकरेंनी स्पष्ट केलं आहे.

एकीकडे तटकरेंनी या प्रकरणानंतर पक्षाची बाजू मांडली असतानाच दुसरीकडे अजित पवारही या प्रकरणावरुन होणाऱ्या टीकेच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच बोलले आहेत. अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळी ते बारामती विमानतळावर पोहचले तेव्हा पत्रकारांनी त्यांना गराडा घातला. यावेळी वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावरुन पत्रकारांनी अजित पवारांना प्रश्न विचारला. पत्रकारांचा हा प्रश्न ऐकताच अजित पवारांनी चालता चालताच अगदी मोजक्या शब्दात प्रतिक्रिया नोंदवली. "मी यासंदर्भात सविस्तर पत्रकार परिषद घेऊन बोलणार आहे," असं अजित पवार म्हणाले. तसेच पुढे त्यांनी, "या प्रकरणाशी माझा दुरान्वये संबंध नाही," असंही म्हटलं आहे. 

हगवणे यांचे पुत्र शशांक आणि वैष्णवीचं थाटामाटत लग्न झाल्याचे व्हिडीओ आता समोर येत आहेत. तसेच या लग्न सोहळ्याला स्वत: अजित पवार उपस्थित होते. मुलीच्या घरच्यांनी दिलेल्या फॉर्चुनरची चावी अजित पवारांनीच शशांकच्या हातात दिल्याचे फोटोही समोर आले. यावरुनच आता अजित पवार हगवणेंविरुद्ध कारवाई करणार का असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे.

वैष्णवीचा हुंड्यासाठी अमानुष छळ केल्याचा सासरे राजेंद्र हगवणेसह सासू, पती, दिर आणि नणंद यांच्यावर आरोप आहे. प्रेम विवाहावेळी 51 तोळे सोनं, फॉर्च्युनर गाडी अन चांदीची भांडी देण्यात आली. तरी जमीन खरेदीसाठी 2 कोटींच्या मागणीचा तगादा लावला होता. तसंच पती शशांक हा चारित्र्यावरून संशयही घेत होता. वेळोवेळी शारीरिक आणि मानसिक छळ केल्यानं राजेंद्र हगवणेंची लहान सून वैष्णवीचा जीव गेला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा अलर्ट
पुढील बातमी
11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थी-पालकांमधून तीव्र नाराजी

संबंधित बातम्या