जिल्ह्यात खरीपाचा ७२ टक्के पेरा

पश्चिम भागात वाफसा अभावी पेरा लांबणीवर; आत्तापर्यंत दोन लाख हेक्टरवर पूर्ण

by Team Satara Today | published on : 27 July 2025


सातारा : सातारा जिल्ह्यात मे महिन्याच्या उत्तरार्धात आणि जूनमध्येही पाऊस मोठ्या प्रमाणात पडल्याने विशेषत: पश्चिम भागामध्ये शेताला वाफसा आला नाही. त्यामुळे जुलै महिना संपत आला तरी पेरणी ७२ टक्केच झाली आहे. २ लाख १४ हजार हेक्टरवरही पेर आहे. यामुळे यंदा खरीप पेरणी १०० टक्के होण्याची शक्यता कमीच आहे. तर सध्या फक्त मका पिकात वाढ झाली असून पेरणी १५३ टक्के झालेली आहे.खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख ९७ हजार ९१३ हेक्टर निश्चित करण्यात आलेले आहे. यामध्ये सोयाबीनचे सर्वाधिक ९२ हजार ८७५ हेक्टर आहे. तर भाताचे ४७ हजार ४९२, खरीप ज्वारी ६ हजार, बाजरीचे ५० हजार ३५१, मका पिकाचे १३ हजार १५३, भुईमूग ३१ हजार हेक्टर राहण्याचा अंदाज होता तसेच इतर पिकांचे क्षेत्र कमी प्रमाणात आहे; पण यावर्षी पाऊस वेळेत झाला; पण सतत पाऊस असल्याने पेरणीसाठी वेळेत वाफसा आलाच नाही. त्यामुळे पेरणी पुढे गेली. आता तर जुलै महिना संपत आला आहे. त्यामुळे खरिपातील पेरणी होण्याची शक्यता कमी आहे; पण भात लागण आणखी वाढणार आहे. पण, यंदा खरिपात १०० टक्के पेरणी होणार नाही, असाच अंदाज आहे.खरिपात आतापर्यंत भाताची सुमारे २७ हजार हेक्टरवर लागण झालेली आहे. हे ५७ टक्के प्रमाण आहे. खरीप ज्वारीची ५२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. बाजरीची सुमारे ३४ हजार हेक्टरवर पेर पूर्ण झाली आहे. ६७ टक्के ही पेर आहे. पेरणीची वेळ निघून गेल्याने यंदाही बाजरीचे क्षेत्र कमीच राहणार आहे. मका पिकाची २० हजार हेक्टरवर पेरणी झालेली आहे. १५३ टक्के ही पेर आहे. तसेच अजूनही मका पिकाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे. भुईमुगाची १८ हजार ७९० हेक्टरवर पेरणी झाली आहे.जिल्ह्यात मागील तीन वर्षांत सोयाबीन क्षेत्रात वाढ झाली आहे. यावर्षी आतापर्यंत सुमारे ६२ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. ६१ टक्के पेरणी पूर्ण आहे. तरीही यंदा सोयाबीनची १०० टक्के पेरणी होण्याची शक्यता कमी आहे. तसेच तूर, मूग, उडीद, कारळा, सूर्यफू या पिकाखालील क्षेत्र कमी आहे.
फलटणमध्ये 101 टक्के पेरणी
सातारा जिल्ह्यात खरीप हंगाम पेरणी आता संपल्यातच जमा आहे. सध्या जिल्ह्याच्या पश्चिम डोंगराळ भागात भात लागण सुरू आहे. फलटण तालुक्यात सर्वाधिक 101 टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. तर सातारा तालुक्यात ४८ टक्के, जावळी तालुक्यात ७३ टक्के, पाटण ४४, कराड ८१, कोरेगाव ७५, खटाव ८४, माण ९३, खंडाळा ६६, वाई ८० आणि महाबळेश्वर तालुक्यात ६२ टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. माण, खटाव, फलटण, खंडाळा या तालुक्यात बाजरी पिकाचे क्षेत्र घटले आहे.

जिल्ह्यात यावर्षी मे महिन्याच्या मध्यापासून पाऊस पडत होता. आजही पाऊस सुरूच आहे. अशातच शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणी केली. सततच्या पावसामुळे अजूनही अनेक ठिकाणी जमिनीला वाफसा नाही, तण वाढले. तसेच पेरणीही करता आलेली नाही. निसर्गाच्या लहरीपणामुळेच यंदा पेरणी कमी राहणार आहे. तसेच काही ठिकाणी दुबार पेरणी झाली. तर आगाप पेरणीच्या ठिकाणी पिकावर कीड आणि रोग पडल्याने अपेक्षित उत्पादन मिळणार नाही.
- राजू शेळके, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
धरणांतून पाणी सोडल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ
पुढील बातमी
एटीएम कार्ड ची अदलाबदल करून वृद्धांना फसवणारा भामटा जेरबंद

संबंधित बातम्या