सातारा : सातारा आकाशवाणी केंद्राच्या लोकप्रिय ‘चिंतन’ या विशेष कार्यक्रमातून मसूर येथील ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार डॉ. बसवेश्वर चेणगे यांचे प्रेरणादायी विचार येत्या १ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत दररोज सकाळी ६ वाजून ५ मिनिटांनी प्रसारित होणार आहेत.
प्रसार भारतीच्या सातारा एफएम केंद्रावरून महिनाभर चालणाऱ्या या उपक्रमात डॉ. चेणगे यांचे ‘जीवनमूल्ये’ या मध्यवर्ती विचार सूत्रावर आधारित अभ्यासपूर्ण व प्रबोधनपर विचार श्रोत्यांना ऐकायला मिळणार आहेत. बदलत्या काळात मानवी जीवनात सकारात्मकता, मूल्यांची जपणूक आणि सामाजिक बांधिलकी रुजवण्यासाठी त्यांचे हे चिंतन मार्गदर्शक ठरणार आहे.
डॉ. बसवेश्वर चेणगे यांनी गेली तीन दशके मराठी भाषा, तिचे संवर्धन आणि साहित्याच्या जतनासाठी अत्यंत तळमळीने योगदान दिले आहे. महाराष्ट्र, गोवा तसेच कर्नाटक सीमाभागातील ग्रामीण व उपेक्षित घटकांपर्यंत साहित्य पोहोचवणारे कृतिशील चळवळीतील कार्यकर्ते म्हणून त्यांची संपूर्ण राज्यात ओळख आहे. मराठी साहित्य चळवळ केवळ शहरांपुरती मर्यादित न राहता ती खेडोपाड्यातील वाचकांपर्यंत पोहोचावी, यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार लक्षवेधी ठरला आहे. त्यांच्या याच निष्ठेतून गेल्या बावीस वर्षांपासून महाराष्ट्र, गोवा आणि सीमावर्ती भागात सातत्याने प्रतिष्ठित ‘गुंफण साहित्य संमेलन’ यशस्वीपणे आयोजित केले जात आहे.
साहित्य क्षेत्रात भरीव योगदान देतानाच त्यांनी वैचारिक, सामाजिक आणि समीक्षात्मक अशा विविध विषयांवर एकूण आठ पुस्तकांचे लेखन केले असून त्यांचे हे ग्रंथ वाचकांच्या पसंतीस उतरले आहेत. त्यांच्या दर्जेदार लेखनाची दखल घेऊन राज्य शासनाच्या ग्रंथ निवड समितीनेही त्यांच्या काही पुस्तकांची अधिकृत निवड केलेली आहे. पत्रकारिता, समाजकारण आणि साहित्य या तिन्ही क्षेत्रांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या डॉ. चेणगे यांच्या समृद्ध आणि मार्गदर्शक विचारांची ही विशेष मालिका ऐकण्याची सुवर्णसंधी सातारा, सांगली, सोलापूर आणि सीमाभागातील आकाशवाणीच्या लाखो श्रोत्यांना नोव्हेंबर महिनाभरात दररोज पहाटे मिळणार आहे.
सातारा आकाशवाणीवर १ नोव्हेंबरपासून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बसवेश्वर चेणगे यांचे ‘चिंतन’
by Team Satara Today | published on : 29 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा