फलटण पंचायत समिती सभापती निवडीत ओबीसी समाजावर अन्याय ; १७ मार्च रोजी तातडीची बैठक; संघटनात्मक भूमिका ठरवली जाण्याची शक्यता

by Team Satara Today | published on : 16 March 2026


फलटण : फलटण पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवड प्रक्रियेनंतर तालुक्यात राजकीय वातावरण तापले असून ओबीसी समाजामध्ये नाराजीची लाट पसरल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर या विषयावर सखोल चर्चा करून पुढील भूमिका ठरविण्यासाठी समस्त ओबीसी समाज, फलटण यांच्या वतीने तातडीची बैठक दि. १७ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता श्रीसंत सावतामाळी मंदिर, फलटण आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये पंचायत समितीच्या निवड प्रक्रियेबाबत चर्चा होणार असून पुढील आंदोलनात्मक किंवा संघटनात्मक भूमिका ठरवली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ओबीसी समाजातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले मत मांडावे व समाजाच्या हक्कासाठी एकजूट दाखवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या बैठकीतून ओबीसी समाजाच्या पुढील राजकीय आणि सामाजिक भूमिकेचा निर्णय होण्याकडे फलटण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

पंचायत समितीमध्ये ओबीसी समाजाचे तब्बल नऊ सदस्य असतानाही सभापती किंवा उपसभापती पदासाठी ओबीसी समाजाला संधी न देण्यात आल्याने समाजावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. पंचायत समितीच्या नेतृत्वाच्या पदांवर निवड करताना ओबीसी समाजाला डावलण्यात आले असून समाजाच्या तोंडाला अक्षरशः पाने पुसण्यात आल्याची चर्चा सध्या फलटण तालुक्यात रंगली आहे. अनेक ओबीसी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त करत समाजाच्या हक्काच्या प्रतिनिधित्वाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
फलटणमध्ये राष्ट्रवादी-भाजपची 'सेटलमेंट' ; भाजपच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीच्या शिवांजली भोसले सभापती, शिवसेनेचे अमोल सस्ते उपसभापती
पुढील बातमी
हिंमत असेल तर कारवाई करून दाखवा - आमदार शशिकांत शिंदे आक्रमक; कोरेगाव पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीवर विधानभवनात जोरदार खडाजंगी

संबंधित बातम्या