सातारा : सोळशी, ता. कोरेगांव, जि. सातारा येथील सोळा शिवलिंग शनैश्वर देवस्थानचे मठाधिपती प पु नंदगिरी महाराज यांच्यावर सोळशी येथील महिलेने केलेल्या विनयभंगाच्या खटल्यातून नंदगिरी महाराजांची कोरेगांव न्यायालयाने आज निर्दोष मुक्तता केली.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, दिनांक १७/९/२०१९ रोजी सोळशी येथील पिडित महिला तिच्या दोन मुलांची नंदगिरी महाराजांच्या मुलीसोबत भांडणे झालेने सदरची भांडणे आपासांत मिटवून घेवू, असे सांगण्यासाठी नंदगिरी महाराजांकडे गेली असता नंदगिरी महाराजांनी तिचा हात धरून ‘मी भांडणे मिटवून घेणार नाही असे म्हणून पिडित महिलेचा हात धरला व मी सांगेल ते केलेस तर मी भांडणे मिटवून घेईल’, असे म्हणून पिडितेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले, अशा आशयाची तक्रार दिनांक १८/०९/२०१९ रोजी सदर पिडित महिलेने करीत नंदगिरी महाराजांच्या विरूद्ध वाठार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्याचा वाठार पोलीसांनी तपास करून कोरेगांव न्यायालयात दोषारोपपत्र पाठविले होते. कोरेगांव न्यायालयामध्ये सदरील खटल्याची सुनावणी पूर्ण होवून सरकार पक्षातर्फे एकूण चार साक्षीदार तपासण्यात आले. नंदगिरी महाराजांच्यावतीने ॲड. किशोर खराडे यांनी केलेला युक्तिवाद ग्राहय धरून कोरेगांव न्यायालयाच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती सी. एस. पाटील यांनी नंदगिरी महाराजांवर केलेला विनयभंगाचा आरोप खोटा असलेचे सिद्ध झालेने त्यांची निर्दोष मुक्तता केली. या खटल्याचे कामी ॲड. किशोर खराडे यांना ॲड. संतोष कुदळे, ॲड. सुदर्शन गावडे, ॲड. अक्षय सरडे यांनी सहाय्य केले. नंदगिरी. महाराजांच्या निर्दोष मुक्ततेमुळे शनैश्वर भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.