सातारा : सातारा पालिकेचा गुरुवार परज येथील महत्त्वाकांक्षी शॉपिंग कॉम्प्लेक्स विकसनाचा प्रकल्प लवकरच मार्गी लागत आहे. या परिसरातील मैदानावर काही टपर्यांची आणि पत्र्याच्या शेडची अतिक्रमणे आहेत. ही अतिक्रमणे शुक्रवारी हटवताना पालिका कर्मचारी आणि शेड चालक यांची जोरदार वादावादी झाली. पालिकेने या अतिक्रमणांना हटवण्यासाठी दोन दिवसाची मुदत दिली आहे. मात्र प्रत्यक्षात कठोर भूमिका घेऊन अतिक्रमण हटाव विभागाने दोन टपर्या हटवत हा परिसर मोकळा करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे.
सातारा पालिका अतिक्रमणाच्या मुद्द्यावर ठोस भूमिका घेत शहर विद्रूपीकरणाला आळा घालत आहे. गुरुवार परज येथील मैदानावर स्वतंत्र शॉपिंग कॉम्प्लेक्स तयार करण्याची प्रक्रिया पालिकेने सुरू केली आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणजे या मैदान परिसरात असणारी टपर्यांची शेड हटवणे. या टपर्या हटवताना शुक्रवारी कर्मचारी आणि शेडचालक यांच्या जोरदार वादावादी झाली. अतिक्रमण हटाव विभागाचे प्रशांत निकम आणि कर्मचारी हे सकाळी अकरा वाजल्यापासून या परिसरात तळ ठोकून होते. वास्तविक या अतिक्रमणांना सात दिवसापूर्वीच इशारा नोटीस देण्यात आली होती. मात्र त्यांच्याकडून कोणतीही हलवाहलवी न झाल्यामुळे अतिक्रमण हटाव पथक प्रत्यक्ष फिल्डवर उतरले आणि त्यांनी धडक कारवाई करत दोन टपर्या हटवल्या. काही ठिकाणी महिला चालक असल्यामुळे कर्मचार्यांची अडचण झाली. या वादावादीत मध्यस्थी करून पालिका प्रशासनाने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. या अतिक्रमणांमुळे पालिकेचा ओपन स्पेस बराचसा गायब झाला आहे.
गुरुवार परज परिसर हा तब्बल 42 गुंठ्याचा आहे. येथे शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि नगरपालिका शाळा स्वतंत्र इमारतीत भरवण्याचा पालिकेचा मानस आहे. पुढील दोन दिवसांमध्ये या परिसरातील सर्व अतिक्रमणे हटवली जाणार असल्याचे नगर प्रशासनाचे अधिकारी प्रशांत निकम यांनी सांगितले आहे.