सातारा : सातारा तालुक्यातील सक्षमरीत्या काम करणाऱ्या आसगाव ग्रामपंचायतच्या वतीने ई-वेहिकल वापरणाऱ्यांचा रविवार दिनांक २३ फेब्रुवारी रोजी संत गाडगेबाबा जयंती व आसगाव ग्रामपंचायत वार्षिक यात्रेनिमित्त पर्यावरण मित्र सन्मान केला जाणार आहे.
आसगाव ग्रामपंचायतीच्या वतीने माझी वसुंधरा अभियान ५.० मध्ये सहभाग घेतला आहे. पंचतत्वांवर आधारित गावांमध्ये शंभर टक्के वृक्ष लागवड, वृक्ष संगोपन करिता ठिबक केले आहे. नवीन हरितक्षेत्रांची, शांतता परिसर निर्मिती करण्यात आली आहे. जलतारा शोषखड्डे, गांडूळ प्रकल्प याकरता योजना राबवले जात आहेत. गावामध्ये संपूर्ण सिंगल युज प्लास्टिक बंदी, फटाके विक्री व वापरावर बंदी लागू करण्यात आली आहे.
आसगाव ग्रामपंचायतच्या वतीने पर्यावरण पूरक सण साजरे केले जात आहेत. हवेतील कार्बन डाय-ऑक्साइड, मोनोक्साईडचे प्रमाण वाढत असून त्याचा परिणाम जीवसृष्टीवर होताना दिसत आहे. हवेतील प्रदूषण कमी करणे, इंधनाची बचत करणे ही काळाची गरज आहे.
आसगाव मध्ये शून्य कार्बन उत्सर्जन करता वचनबद्धता ठेवून नूतनीकरण ऊर्जा वापरा करता प्रोत्साहन देणे यासाठी सर्व ग्रामस्थांनी ई-वेहिकल चा वापर करावा, असा संदेश गावात पसरविण्यात आला. स्वातंत्र्यदिनी दुचाकी, चार चाकी व तीन चाकी, ई-वेहिकल खरेदी करणाऱ्यांना पहिले सहा महिने चार्जिंग फ्री ठेवण्यात आले होते. ई-वेहिकल वापर करणाऱ्यांचा आसगाव ग्रामपंचायतीने संत गाडगेबाबा जयंती तसेच गावच्या वार्षिक यात्रेनिमित्त दिनांक 23 फेब्रुवारी रोजी गावच्या यात्रेच्या उत्सवाचे औचित्य साधून पर्यावरण मित्र सन्मान करण्याचे ग्रामपंचायतीने आयोजित केले आहे.
या उपक्रमाला गावामध्ये उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत असल्याच्या प्रतिक्रिया सरपंच सुनंदा शिंदे, उपसरपंच हिरालाल शिंदे, सदस्य रेश्मा शिंदे, सदस्य आशा शिंदे, सदस्य बाजीराव शिंदे सदस्य, हर्षल शिंदे सदस्य, लता शिंदे सदस्य, प्रभा कांबळे यांनी व्यक्त केल्या. ग्रामविकास अधिकारी अनुजा भगत यांनी विधायक उपक्रम राबवण्यासाठी सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, सातारचे गटविकास अधिकारी सतीश बुध्दे व मार्गदर्शक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या पद्धतीने माजी वसुंधरा योजना राबवण्यात आली आहे. यामध्ये आसगाव ग्रामस्थांचा मोलाचा वाटा असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.