धाराशिव : आषाढी एकादशीनिमित्तपंढरपूरच्या पांडुरंगाच्या चरणी लीन होणाऱ्या लाखो वारकऱ्यांमधून शासकीय महापूजेसाठी निवड होणे हा प्रत्येक विठ्ठलभक्ताच्या आयुष्यातील सर्वोच्च आणि भाग्याचा सन्मान मानला जातो. यंदा हा ऐतिहासिक बहुमान धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौरगाव येथील शेतकरी वारकरी दाम्पत्य बाबासाहेब माधव माने व प्रभावती बाबासाहेब माने यांना मिळाला आहे. या अभूतपूर्व सन्मानामुळे कळंब तालुक्याच्या आध्यात्मिक व वारकरी परंपरेत सुवर्णाक्षरांनी मानपत्र जोडले गेले आहे.
२० वर्षांची अविरत भक्ती; संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीसोबत पायी वारी
चंद्रभागेच्या तीरी आषाढीच्या महासोहळ्यासाठी दरवर्षी विठ्ठलभक्तांचा जनसागर लोटतो. उन्हा-पावसाची तमा न बाळगता शेकडो किलोमीटरची पायपीट करणाऱ्या वारकऱ्यांमध्ये माने कुटुंब मागील दोन दशकांपासून अविरत सेवा देत आहे. बाबासाहेब माने आणि प्रभावती माने हे दाम्पत्य मागील सलग २० वर्षांपासून पंढरीची वारी करत असून, यंदाही त्यांनी आळंदीवरून निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होऊन संपूर्ण पायी वारी पूर्ण केली. त्यांच्या याच अखंड निष्ठा आणि भक्तीचे फळ म्हणून विठुरायाने हा महापूजेचा मान दिल्याची भावना व्यक्त होत आहे.
कळंब तालुक्याच्या इतिहासातील पहिलाच बहुमान; दोन पिढ्यांपासून वारीचा वारसा
विशेष म्हणजे, कळंब तालुक्याच्या संपूर्ण इतिहासात प्रथमच शासकीय महापूजेचा हा बहुमान तालुक्यातील वारकरी कुटुंबाला मिळाला आहे. माने कुटुंब मूळचे अत्यंत साधे शेतकरी असून, त्यांच्या घरात वारीची परंपरा दुसरी पिढी जोपासत आहे. शेतीची कष्टाची कामे सांभाळत मुखी विठ्ठलाचे नामस्मरण आणि पायी वारी असा त्यांचा जीवनक्रम आहे. त्यांच्या या सन्मानाने संपूर्ण गौरगाव आणि कळंब तालुक्यात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भक्तीमार्गावरील समर्पणाला मिळालेली मानाची पावती
राज्याचे मुख्यमंत्री सपत्नीक श्री विठ्ठलाची महापूजा करतात, त्यावेळी लाखो वारकऱ्यांचे प्रतिनिधित्व म्हणून एका वारकरी दाम्पत्याला पूजेचा मान दिला जातो. यंदा कळंबच्या भक्तीमार्गावर असलेल्या अथांग श्रद्धेला आणि समर्पणालाच पांडुरंगाने ही मानाची पावती दिल्याटी भावना संपूर्ण वारकरी संप्रदायातून व्यक्त होत आहे. माने कुटुंबाच्या या बहुमानाबद्दल तालुकाभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.