सातारा : बारीव (ता. कोरेगाव) येथील आर्मी जवानाच्या घरातून चोरीला गेलेल्या सुमारे दोन लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या चेनचा रहिमतपूर पोलिसांनी अवघ्या 24 तासांत छडा लावला. चोरीचे सोने विक्रीसाठी सराफाकडे येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत एका विधिसंघर्षित बालकास ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीस गेलेली 16 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन पूर्णपणे हस्तगत करण्यात आली.
आर्मी जवान धनंजय संतोष पोळ हे 26 ऑगस्ट रोजी सकाळी घरातील वरच्या मजल्यावरील खोलीत गेले होते. त्यांनी गळ्यातील सोन्याची चेन काढून टेबलवर ठेवली आणि त्यानंतर शेतातील कामासाठी बाहेर गेले. दुपारी घरी परतल्यानंतर चेन गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. शोध घेऊनही चेन न मिळाल्याने त्यांनी रहिमतपूर पोलिसांत तक्रार दाखल केली.
याप्रकरणी गुन्हा क्रमांक 134/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 305 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी, तांत्रिक माहितीचे विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाला वेग दिला.
दरम्यान, चोरीचे सोने सराफाकडे विक्रीसाठी आणले जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून संबंधित बालकास ताब्यात घेतले. चौकशीत त्याच्याकडून सोन्याची चेन जप्त करण्यात आली. बाल न्याय कायद्यानुसार पुढील कारवाई सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली रहिमतपूर पोलिसांच्या पथकाने केली.