मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय फ्रँचायझी ‘मुंबई पुणे मुंबई’ आता चौथ्या भागाकडे वाटचाल करत आहे. आतापर्यंत या मालिकेचे तीन भाग प्रदर्शित झाले असून तिन्ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. गेल्या काही दिवसांपासून ‘मुंबई पुणे मुंबई 4’ कधी येईल, याबाबत चर्चेला गती मिळाली होती. नुकतेच मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी यांच्या धमाकेदार केमिस्ट्रीसह या सिनेमाचा चौथा भाग अधिकृतपणे जाहीर केला गेला आहे.यामुळे तब्बल 15 वर्षांनंतर, गौरी–गौतमची लव्हवाली केमिस्ट्री प्रेक्षकांना पुन्हा अनुभवायला मिळणार आहे.मुंबई पुणे मुंबई या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. या चित्रपटाचे तीन ही भाग प्रेक्षकांना खुप आवडले. पहिल्या भागाप्रमाणेच चित्रपटाच्या इतर भागांनाही प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. अशातच आता मुंबई पुणे मुंबईच्या चौथ्या भागाची घोषणा करण्यात आली आहे.
नुकताच सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये ही घोषणा करण्यात आली असून, हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.व्हिडीओमध्ये ‘मुंबई पुणे मुंबई’च्या पहिल्या तीन भागांची झलक दाखवली आहे आणि शेवटी चौथा भाग प्रदर्शित होणार असल्याची घोषणा केली जाते. प्रेक्षकांनी या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट्स केल्या असून, ते स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांची जोडी पुन्हा एकत्र पाहण्यास उत्सुक आहेत.हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रेक्षकांमध्ये मोठा उत्साह निर्माण करत असून, चौथ्या भागाच्या रिलीजची प्रतिक्षा वाढवत आहे.
मुंबई पुणे मुंबई ४’ या सिनेमाची रिलीज तारीख अजून जाहीर झाली नाही, तरी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.आधीच्या तीन भागांप्रमाणे, चौथ्या भागात स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तसेच विजय केंकरे, सविता प्रभुणे, प्रशांत दामले, मंगल केंकरे यांसारखे कलाकारही प्रमुख भूमिकेत असण्याची शक्यता आहे.तिसऱ्या भागाच्या शेवटी गौरी–गौतमला जुळी बाळं झाल्याचे दाखवण्यात आले होते. आता चौथ्या भागात गौरी–गौतमच्या आयुष्याची कहाणी पुढे कशी रंगणार, याकडे प्रेक्षकांचे सर्व लक्ष लागले आहे.