सातारा : सज्जनगड येथील श्री समर्थ सेवा मंडळाच्या वतीने सुरू झालेल्या यावर्षीच्या श्री दास नवमी महोत्सव कार्यक्रमांमध्ये मान्यवर महोदयांची प्रवचने तसेच कीर्तने होत आहेत. उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या श्रीरामभक्त निवास मधील ग्रंथराज दासबोध वाचन पारायण सोहळ्यास संपूर्ण देशातून शेकडो समर्थ भक्त मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहेत. यामध्ये महिलांचा विशेष सहभाग दिसून येत आहे.
श्रीराम भक्त निवास मधील राम पंचायतन मूर्ती पुढे सौ. रसिकाताई ताम्हणकर व समर्थ भक्त विद्याधरबुवा वैशंपायन यांच्या मार्गदर्शनाखाली हा ग्रंथराज दासबोध वाचन सोहळा दररोज सकाळी साडेआठ ते अकरा या वेळेत 22 फेब्रुवारी म्हणजे दासनवमी पर्यंत सुरू राहणार आहे.
दरम्यान मंडळाच्या वतीने आयोजित धार्मिक कार्यक्रमांमध्ये प्रवचन मालेमध्ये ज्येष्ठ निरूपणकार व सज्जनगड मासिकाचे संपादक डॉ. अजित कुलकर्णी, पुणे यांनी मनाच्या श्लोकांवर अतिशय समग्र असे निरूपण केले. दोन दिवस चाललेल्या या प्रवचन काळामध्ये. नुपेक्षि कदा रामदासाभिमानि... या समर्थ रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकातील 27व्या श्लोका पासून पुढे सुरुवात करत माघ वद्य प्रतिपदा म्हणजेच नृसिंह सरस्वती यांचे निजामंदी प्रयाण बाबत तसेच श्रीधर स्वामी व समर्थांच्या कार्याचा आढावा त्यांनी आपल्या प्रवचनात सांगितला.
माघ शुद्ध प्रतिपदा अर्थात गुरुप्रतीपदेचे महत्त्व विशद करताना त्यांनी मनाच्या लोकांना सुरुवात केली. भगवंत हा भक्ताची उपेक्षा कधीच करत नाही. समर्थांनी दाखवून दिलेले अनेक दाखले व श्लोकातील जो भाग येतो त्याचे वर्णन अतिशय सुरेखपणे डॉ.अजित कुलकर्णी यांनी करताना उपस्थित त्यांना सांगितले की, मनाच्या श्लोकातून मानवी जीवनातील संवेदनशील मनाचे सूक्ष्म चिंतन व्यक्त केले आहे. जीवनात अनेक अडचणी प्रसंग, सुखदुःखाचे क्षण हे येतात. मात्र त्याकडे कसे पहावे याचे विश्लेषण सुरेखपणे श्लोकात आढळते. आमची भक्ती अनन्य अशी व्हावी यासाठी कर्म हे भगवंताला स्मरत करा. चिंतनात मन, बुद्धी,चित्त स्थिर ठेवा तर तुम्हाला दृष्टी मिळते, विचार मिळतो. अनन्य भाव हा कर्माशी निगडित आहे. चिंतनामध्ये योग क्षेम म्हणजे शाश्वत सुखाची प्राप्ती हा योग क्षेम आणि त्याचे रक्षण करणारा हा स्वतः परमेश्वरच आहे. असेही प्रवचनात सांगितले.