सातारा : आळजापूर, ता. फलटण येथील महिलांनी पोवई नाक्यावरून थेट पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानापर्यंत बुधवारी मोर्चा काढला. व्यसनमुक्त युवक संघाचे अध्यक्ष हभप विलास बाबा जवळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा काढण्यात आला. पालकमंत्र्यांनी आंदोलन महिलांची भेट घेत आळजापूर येथील परमिट रूम प्रकरणाचा फेर अहवाल पुन्हा मागवण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
आळजापूर, ता. फलटण गावातील परमिट रूम ग्रामसभेचा विरोधात ठराव होऊन सुद्धा उत्पादन शुल्क खात्यातील अधिकार्यांच्या आशीर्वादामुळे सुरू झाले आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला होता. या प्रकरणाच्या निषेधार्थ आळजापूर गावातील महिलांनी पालकमंत्री शंभूराजे यांच्या निवासस्थानासमोर मोर्चा आणण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार बुधवारी पोवई नाका शिवतीर्थ ते पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या कोयना दौलत या निवासस्थानापर्यंत टाळ मृदुंगाच्या गजरात मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये सुमारे 200 हून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या. पालकमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर प्रचंड गर्दी झाली होती. पोलीस बंदोबस्तही तगडा तैनात होता.
महिलांनी टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये भजन कीर्तन सुरू ठेवले होते. लोकशाही मार्गाने जाणारे आंदोलन पाहून पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी निवासस्थानाबाहेर येऊन हभप विलास बाबा जवळ आणि आंदोलक महिलांची भेट घेतली. आळजापूर ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेचा ठराव डावलून हे परमिट रूम बेकायदेशीररित्या सुरू करण्यात आल्याची तक्रार यावेळी करण्यात आली. या प्रकरणावर बोलताना शंभूराज देसाई म्हणाले, सातारा उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक यांच्याकडून आळजापूर येथील परमिट रूमच्या संदर्भात फेर अहवाल मागवण्यात येईल. या संपूर्ण प्रस्तावाची पडताळणी करून यासंदर्भात योग्य तो निर्णय दिला जाईल, असे ते म्हणाले.