‘‘माजी मुख्यमंत्री अब्दुल रहमान अंतुले मुळचे ब्राह्मण, त्यांचे आडनाव करंदीकर’’ - नितीन गडकरी यांचा खळबळजनक खुलासा

by Team Satara Today | published on : 07 April 2026


नागपूर : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले हे मुळचे कोकणस्थ ब्राह्मण होते आणि त्यांचे आडनाव करंदीकर' होते, असे विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आज भाजपच्या स्थापना दिन कार्यक्रमात केले. त्यांच्या या विधानानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. यावेळी त्यांनी इराण आणि भारताचे संबंध किती जिव्हाळ्याचे होते यावरही प्रकाश टाकला.

मंत्री गडकरी म्हणाजे की, ‘अंतुले मुख्यमंत्री असताना मी त्यांना भेटायला गेलो होतो. त्यावेळी त्यांनी स्वतः मला सांगितले होते की, मी मुळचा ब्राह्मण असून माझे खरे आडनाव करंदीकर आहे.’ काही कर्मठ प्रवृत्तींमुळे त्यांच्या पूर्वजांना धर्माबाहेर काढण्यात आले, परिणामी त्यांचा धर्म बदलला. त्या काळात मांसाहार करणे किंवा परदेशात जाणे यांसारख्या कारणावरूनही समाजातून बहिष्कृत केले जात असे, याकडेही गडकरींनी लक्ष वेधले.

विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या आरोपांचा समाचार घेताना गडकरी म्हणाले की, ‘‘ हिंदू हा केवळ धर्म नसून तो एक जीवनप्रवाह आहे. आपण सर्व या एकाच संस्कृतीने जोडले गेलो आहोत. भाजप कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही.संविधानातील 'सेक्युलर' शब्दाचा अर्थ धर्मनिरपेक्ष नसून 'सर्वधर्म समभाव' असा आहे. भाजप याच विचारधारेवर चालतो. संविधान धोक्यात येईल किंवा मुस्लिमांना देशाबाहेर काढले जाईल, ही भीती केवळ राजकीय हेतूने पसरवली जात असून ती पूर्णपणे चुकीची आणि दिशाभूल करणारी आहे. खरेतर देश चालवणारा नेता हा कोणत्याही जाती-धर्माचा असला तरी तो राज्यकारभारात धर्मनिरपेक्ष असावा, मात्र व्यक्ती म्हणून प्रत्येकाला आपापल्या श्रद्धेनुसार पूजा करण्याचा अधिकार आहे. सेक्युलर होते तर ब्राम्हणांना बोलावून इंदिरा व राजीव गांधी यांना मंत्राग्नी का दिला? राजीव गांधींनी पंतप्रधान असताना पूजाविधीसाठी ब्राह्मणांना बोलावले नसते, याकडेही गडकरींनी लक्ष वेधले.

खुर्ची कधीही जाऊ शकते

दरम्यान, खूर्ची कधीही जाऊ शकते, हे टेम्पररी काम आहे. खूर्ची मिळाल्यावर शांततेने राहा, अंगात येऊ देवू नका. खूर्ची कधीही जाऊ शकते. पोलिसही तुम्हाला लगेच सोडून जातात असा हितोपदेश गडकरी यांनी दिला. कार्यकर्ते आणि नेत्यांच्या पिढ्या बदलत राहातात. नेत्याच्या पोटातून नेता जन्माला आला पाहिजे असे नाही. कार्यकर्त्यामधून नेतृत्व विकसित झाले पाहिजे यावर भर दिला.

खोमेनी मूळचे लखनऊ जवळील गावाचे

इराणमधील चाबाहार बंदर उभारणी दरम्यान गेलो असता, तिथल्या विद्यापीठात संस्कृत विभाग असल्याचे आणि भाषेतील साम्य स्वतः आयतुल्राह खोमेनी यांनी आपल्याला सांगितल्याचे गडकरी म्हणाले. किंबहुना खोमेनी यांचे पूर्वज लखनऊ जवळचे होते असेही सांगितले. वर्तमान पार्श्वभूमीवर गडकरींच्या विधानाला महत्व आले आहे.

अफगाणीस्तान, इराण, पाकिस्तान, उझबेकीस्तान या देशांसह सिंधु नदीच्या पुढे विकसित झालेल्या संस्कृतीशी आमचे नाते होते. त्यांनी मला पर्शियन भाषा कुठून आली हे विचारले. संस्कृत आमची मूळ भाषा असून पर्शियन भाषेचा उगम संस्कृतमधून झाल्याचे खोमेनी यांनी सांगितले होते. इराणमधील तेहरान विद्यापीठात संस्कृत विभाग असल्याचे सांगितले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
'त्या दरवाजाआड' कथासंग्रहाचा लोकार्पण सोहळा संपन्न; मान्यवरांच्या उपस्थितीत कथासंग्रहावर चर्चा
पुढील बातमी
दुचाकीच्या धडकेत सुळेवाडीतील एक जण ठार; मल्हारपेठ पोलिस ठाण्यात घटनेची नोंद

संबंधित बातम्या