सातारा पालिकेच्या विषय समिती सभापतींच्या आज निवडी; भाजप देणार नव्या जुन्या चेहऱ्यांना संधी

by Team Satara Today | published on : 11 February 2026


सातारा :  सातारा पालिकेच्या राजकीय दृष्ट्या महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या सभापती निवडीचा धुराळा आज (बुधवारी) उडणार आहे .दुपारी १२ वाजता होणाऱ्या विशेष सभेत पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या कोणाकडे द्यायच्या, याचाअंतिम चित्र स्पष्ट होणार आहे .खासदार उदयनराजे भोसले यांनी नव्या चेहऱ्यांची यादी फायनल केली असून आमदार गटाची यादी अद्याप गुलदस्त्यात आहे .सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे हे लातूर वरून सभापतींची नावे जाहीर करणार आहेत. दोन्ही राजेंनी नव्या कारभाऱ्यांची यादी तयार केली असून, अनेक नावे सध्या चर्चेत आहेत; परंतु कोणाच्या गळ्यात सभापतिपदाची माळ पडणार हे बुधवारीच स्पष्ट होणार आहे.

सातारा पालिकेत यंदा प्रथमच ५० नगरसेवक जनतेतून निवडून आले. या निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नेहमीप्रमाणे समतोल राखण्यावर भर दिला. उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्य निवडीवेळी जो बिनविरोध फॉर्म्युला यशस्वी झाला, तोच कित्ता आता सभापती निवडीतही गिरवला जाणार आहे. सध्या तरी बांधकाम व आरोग्य ही महत्वाची खाती शिवेंद्रसिंहराजे यांच्या गटाकडे जाण्याची शक्यता आहे. बांधकाम सभापतीपदि नगरसेवक जयवंत भोसले व बाळासाहेब खंदारे यांच्यापैकी एकाची आराेग्य सभापतीपदि राजू गोरे यांची वर्णी लागू शकते. नियोजन सभापतीपद उदयनराजे गटाकडे जाणार असल्याची चर्चा असून, अशोक शेडगे यांना संधी मिळू शकते. तर महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी मोनिका घोरपडे व दुर्बल घटक व विशेष कल्याणकारी समिती सभापतीपदी संकेत साठे यांची वर्णी लागू शकते.

सभापती पदासाठी इच्छुकांची मोठी फौज असली तरी राजकीय परंपरेनुसार अंतिम निर्णय ‘राजवाड्या’वरूनच होणार आहे.दोन्ही राजेंनी सुवर्णमध्य काढत नावांची यादी निश्चित केली आहे. नाराज मंडळींना शांत करण्यासाठी एका वर्षाच्या कार्यकाळाचा रोटेशन फॉर्म्युला वापरला जाण्याची दाट शक्यता असून, यामुळे प्रत्येकाला संधी मिळण्याची आशा कायम राहणार आहे.

सभापती निवडीमध्ये समन्वय राहणार

यंदाच्या निवडीत महिला व पुरुष असा समतोल राखतानाच, ज्यांचा जनसंपर्क दांडगा आहे, अशा शिलेदारांना झुकते माप दिले जाणार आहे. महत्त्वाच्या खात्यांचे वाटप करताना निव्वळ राजकीय सोय न पाहता, प्रशासनावर वचक ठेवणारे आणि कामाचा अनुभव असलेले मोहरे राजेंकडून निवडले जाणार आहेत. त्यामुळे बुधवारच्या सभेतून साताऱ्याच्या सत्तेची नवी समीकरणे स्पष्ट होतील.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अनैतिक संबंधाच्या संशयातून खून करुन पेटवले; चौघांना अटक ; स्थानिक गुन्हे शाखा, लोणंद पोलिसांची कारवाई
पुढील बातमी
बारावीची परीक्षा उत्साहात सुरू; यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत

संबंधित बातम्या