भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे निधन

वयाच्या 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

by Team Satara Today | published on : 06 December 2024


अकोले : भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे निधन झाले आहे. ते ८४ वर्षांचे होते. नाशिक येथील ९ प्लस रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांना 15 ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास राजूर येथील राहत्या घरी असताना ब्रेनस्ट्रोकचा झटका आला होता. गेल्या दीड महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.  दरम्यान मधुकर पिचड यांच्या जाण्याने चिरंजीव वैभव पिचड यांच्यासह कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मग भाजप असा त्यांचा प्रवास होता. १९८० ते २०१४ या काळात त्यांनी अकोले विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून काम केले. १९९५ ते १९९९ या काळात ते विधानसभेत विरोधीपक्ष नेते होते.

मधुकर पिचड यांनी १९६१ साली अकोले येथे अमृतसागर दूध सहकारी संस्थेची स्थापना केली. तर अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे ते संस्थापक अध्यक्ष होते. १९९३ साली स्थापन झालेला हा भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना होता. पिचड यांच्या राजकारणाची सुरुवात काँग्रेसमधून झाली नंतर ते शरद पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले. २०१९ साली त्यांनी पुत्र वैभव पिचडसह भाजपमध्ये प्रवेश केला होता.

पिचड यांचा जन्म १ जून १९४१ रोजी राजूर येथे झाला. त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज येथून बीए एलएलबीचे शिक्षण घेतले. विद्यार्थी असतानाच पिचड यांनी राजकारणात प्रवेश केला. १९७२ मध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. ७२ सालीच ते पंचायत समिती अध्यक्ष झाले. अध्यक्ष म्हणून त्यांनी १९८० पर्यंत काम केले.

मधुकर पिचड यांनी सलग ३४ वर्ष अकोले मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. १९९१ साली सुधाकर नाईक यांच्या मंत्रिमंडळात त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. त्यांच्याकडे आदिवासी विकास मंत्रालय होते. त्यानंतर पिचड यांनी शरद पवार, विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
लाडकी बहीण योजनेसाठी नागपूर अधिवेशनात विशेष तरतूद केली जाणार
पुढील बातमी
सातारा शहरात महामानवाला अभिवादनासाठी विधायक उपक्रम

संबंधित बातम्या