जम्मू आणि काश्मीर भारताचा महत्त्वाचा भाग : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची भेट घेतल्यानंतर गोर यांनी काश्‍मीरबाबत महत्त्वपूर्ण विधान

by Team Satara Today | published on : 19 August 2026


श्रीनगर : जम्मू आणि काश्मीर भारताचा एक महत्त्वाचा भाग आहे, असे अमेरिकन राजदूत सर्जिओ गोर यांनी बुधवारी श्रीनगरच्या आपल्या पहिल्या भेटीदरम्यान स्‍पष्‍ट केले. केंद्र सरकारने कलम ३७० रद्द केल्यानंतर आणि पहलगाममधील हल्ल्यानंतर अमेरिकन राजदूतांनी जम्‍मू-काश्‍मीरला दिलेली ही पहिलीच भेट होती; या भेटीदरम्यान जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची भेट घेतल्यानंतर गोर यांनी हे महत्त्वपूर्ण विधान केले.पाकिस्तानकडून वारंवार होणाऱ्या कुरापतींच्या पार्श्वभूमीवर, जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे या भारताच्या भूमिकेला अमेरिकेच्या राजदूताच्या या विधानामुळे मोठा पाठिंबा मानला जात आहे.

सर्जिओ गोर म्‍हणाले की, "येथे येऊन आनंद झाला... हा भारताचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. मी पहिल्यांदाच येथे आलो असून ही अत्यंत सुंदर जागा आहे." अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अत्यंत जवळचे मानले जाणारे सर्जिओ गोर यांनी जम्मू आणि काश्मीरसाठी लागू असलेल्या अमेरिकेच्या 'प्रवास प्रवासासंदर्भातील सूचनांविषयी' विचार करण्याचे संकेत दिले आहेत.

'लेव्हल ४ - प्रवास टाळा' याबाबत आम्ही विचार करू

सध्या अमेरिकेने सुरक्षेच्या कारणास्तव जम्मू-काश्मीरसाठी 'लेव्हल ४ - प्रवास टाळा' असा इशारा दिलेला आहे.याविषयी बोलताना गोर म्हणाले, "अमेरिकेकडून देण्यात आलेला हा प्रवास टाळण्याचा इशारा मागे घेता येईल का किंवा तो कमी करता येईल का, यावर आम्ही विचार करू. या प्रदेशातील सुरक्षा वाढवण्यासाठी आणि परिसर अधिक सुरक्षित करण्यासाठी अत्यंत उल्लेखनीय पावले उचलण्यात आली आहेत."

काश्मीरच्या आर्थिक सहकार्य वाढवण्यावर भर

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर केलेल्या एका पोस्टमध्ये गोर यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेत काश्मीरच्या विकासाचे प्राधान्यक्रम आणि आर्थिक सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात आला. "आम्ही आर्थिक सहकार्य अधिक दृढ करण्याच्या आणि दोन्ही देशांना परस्पर फायदेशीर ठरतील अशा संधी निर्माण करण्याच्या मार्गांवर चर्चा केली," असे त्यांनी नमूद केले.

सर्जिओ गोर लडाख दौऱ्यावर जाणार

उपराज्यपालांची भेट घेतल्यानंतर सर्जिओ गोर लडाख दौऱ्यावर जाणार आहेत. केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करून त्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केल्यानंतर सात वर्षांनी होत असलेल्या या उच्चस्तरीय दौऱ्याला मोठे राजकीय आणि मुत्सद्दी महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यातच सध्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये (PoK) असंतोष उफाळून आला असताना हा दौरा होत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
"महिन्यापूर्वी तर मी देशद्रोही होतो?" केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या 'एनडीए'च्या ऑफरवर अभिजित दिपके यांचा खोचक टोला
पुढील बातमी
राज्यात एफडीएची धडक कारवाई; गुटखा-पानमसाला प्रकरणात १० जणांना अटक, १ कोटी ७ लाख ६१ हजार ९४४ रुपये किमतीचा माल जप्त

संबंधित बातम्या