वाठार स्टेशन : पिंपोडे खुर्द (ता. कोरेगाव) येथील कार अपघातात जखमी झालेल्या एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. गंगूबाई शंकर माने (वय ७०, रा. पिंपोडे खुर्द) असे मृत महिलेचे नाव आहे. याबाबत माहिती अशी, की सातारा- लोणंद रस्त्यावर पिंपोडे खुर्द येथे ९ जुलैला रात्री ९ वाजता भरधाव वेगात आलेल्या चारचाकीने (एमएच ०१ एव्ही ३८९२) बस स्थानक परिसरात उभ्या असलेल्या गंगूबाई माने यांना पाठीमागून जोरदार धडक दिली.
यात त्या गंभीर जखमी झाल्या आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची फिर्याद संजय सदाशिव माने यांनी वाठार स्टेशन पोलिसात दिली आहे. राजीव चिमनलाल सिद्धपुरा (रा. भाईंदर, ठाणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस हवालदार गिरी करीत आहेत.