दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीचा खून करणार्‍या पतीला जन्मठेप; उंब्रज पोलिसांच्या भक्कम तपासाला यश

by Team Satara Today | published on : 26 October 2026


कराड : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून स्वतःच्या पत्नीचा कुर्‍हाडीने वार करून निर्घृण खून करणार्‍या पतीला न्यायालयाने दोषी ठरवून जन्मठेप आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास त्याला अतिरिक्त सहा महिने साधा कारावास भोगावा लागणार आहे. मे 2019 मध्ये कराड तालुक्यातील चोरे येथे घडलेल्या या खळबळजनक गुन्ह्याचा उंब्रज पोलिसांनी सखोल तपास करून न्यायालयात भक्कम पुरावे सादर केल्याने आरोपीला ही कठोर शिक्षा मिळण्यास मदत झाली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी, ही धक्कादायक घटना दिनांक 20 मे 2019 रोजी चोरे (ता. कराड) येथील बेघरवस्तीतील ग्रामपंचायत मिळकत नंबर 952 मधील राहत्या घरात घडली. यातील आरोपी आनंदा दादू सातपुते (वय 52 वर्षे, रा. चोरे) याने दारूसाठी पैसे दिले नसल्याच्या कारणावरून चिडून जाऊन पत्नी सौ. शशिकला यांच्याशी कडाक्याचे भांडण केले. रागाच्या भरात त्याने घरात असलेली कुर्‍हाड घेऊन, झोपलेल्या अवस्थेत असलेल्या पत्नीच्या डाव्या कानालगत व खालील बाजूस सलग दोन वर्मी घाव घातले, ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मयत महिलेचा मुलगा आकाश सातपुते (वय 22) याने दिलेल्या फिर्यादीवरून उंब्रज पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्कालीन तपासी अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी तत्परतेने शोध घेत 24 मे 2019 रोजी आरोपी आनंदा सातपुते याला अटक केली. तपासादरम्यान त्यांनी घटनास्थळावरून गुन्ह्यात वापरलेली कुर्‍हाड व मयताच्या अंगावरील कपडे जप्त करून वैद्यकीय आणि परिस्थितीजन्य पुराव्यांची भक्कम साखळी तयार केली व न्यायालयात परिपूर्ण दोषारोपपत्र दाखल केले.
या खटल्याचे सुरुवातीचे कामकाज कराड सत्र न्यायालयाच्या प्रथम अतिरिक्त सत्र न्यायाधीश यु. एल. जोशी यांच्यासमोर चालले. त्यावेळी खटल्यातील एकूण 14 साक्षीदारांच्या साक्षीसह विविध ठिकाणच्या शिक्षांचे दाखलेही अतिरिक्त सरकारी अभियोक्ता पुष्पा जाधव यांनी न्यायालयासमोर मांडले होते. न्या. जोशी यांची बदली झाल्यानंतर या खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश संतोष शिंदे यांच्यासमोर पार पडली. तपासी अधिकार्‍यांनी सादर केलेले शास्त्रोक्त पुरावे आणि सरकारी वकील आर. सी. शहा यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी  श्रीमती राजश्री पाटील आणि उंब्रज पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या खटल्यात न्यायालयीन कामकाजासाठी (पैरवी अधिकारी) पो.हवा. एस. एम. मुळे आणि पो.कॉ. पी. एच. कार्वेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारचे मध्यवर्ती बसस्थानक आता होणार नवीन; बांधकामाच्या कामाला वेगाने प्रारंभ
पुढील बातमी
दुचाकीला धडक देऊन एकास जखमी केल्याप्रकरणी कार चालकावर गुन्हा

संबंधित बातम्या