सूरज गुरव यांची सातारा जिल्ह्याच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती; डॉ. वैशाली कडूकर यांची पुण्यात बदली

by Team Satara Today | published on : 04 November 2026


सातारा : कडक शिस्तीचे व कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी सूरज गुरव यांची सातारा जिल्ह्याच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झाली असून, येथील विद्यमान अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांची पुणे येथे बदली करण्यात आली आहे.
सूरज गुरव यांनी यापूर्वी कराड येथे पोलीस उपअधीक्षक म्हणून कार्यभार सांभाळला होता. त्यामुळे सातारा जिल्ह्याचा व येथील कायदा-सुव्यवस्थेचा त्यांना चांगला अनुभव असून, त्यांच्या नियुक्तीमुळे पोलीस प्रशासनाला त्यांच्या या दांडग्या अनुभवाचा मोठा फायदा होणार आहे. कराड येथील आपल्या कार्यकाळात त्यांनी गुन्हेगारी प्रवृत्ती आणि अवैध धंद्यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला होता. समाजकंटक तसेच कायदा हातात घेणाऱ्यांवर थेट आणि ठोस पावले उचलल्यामुळे त्यांची एक धडाकेबाज अधिकारी म्हणून ओळख निर्माण झाली होती. अल्पावधीतच त्यांनी आपल्या कार्यशैलीने सामान्य नागरिकांचा विश्वास संपादन केला होता. कराडमधील त्यांचा कार्यकाळ वर्षभरातच संपुष्टात येऊन जेव्हा त्यांची नागपूर येथे बदली झाली, तेव्हा या निर्णयाविरोधात स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर उतरून तीव्र भावना व्यक्त केल्या होत्या.
याशिवाय, कोल्हापूर येथे कर्तव्यावर असताना महानगरपालिकेच्या एका गाजलेल्या प्रकरणात त्यांनी घेतलेली निडर व बाणेदार भूमिका विशेष चर्चेत राहिली होती. त्या घटनेचा व्हिडिओही सर्वत्र प्रचंड व्हायरल झाला होता. राजकीय दबावाला बळी न पडता कर्तव्य चोख बजावणारे अधिकारी अशी ख्याती त्यांनी मिळवली. त्यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागातही (एसीबी) उल्लेखनीय सेवा बजावली आहे. नांदेड येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांनी प्रशासकीय जबाबदाऱ्यांसोबतच सामाजिक आणि ऐतिहासिक उपक्रमांनाही नेहमी प्रोत्साहन दिले. तेथील गडकिल्लेदारांसाठी त्यांनी चार दिवसांचा ऐतिहासिक गडकिल्ले अभ्यास दौरा आयोजित करून तरुणांमध्ये ऐतिहासिक वारशाविषयी जनजागृती निर्माण केली होती. आता सातारा जिल्ह्याच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदाची धुरा हाती घेतल्यानंतर जिल्ह्यातील गुन्हेगारीवर ते पुन्हा कशा प्रकारे वचक निर्माण करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कोरेगाव तालुक्यातील वेळू येथे लोकसहभागातून वनराई बंधाऱ्याची उभारणी; भूजल पातळी वाढण्यास होणार मदत
पुढील बातमी
सातारा जिल्हा बँकेत भाजपचे वर्चस्व, मात्र सत्तेच्या चाव्या राष्ट्रवादी व शिवसेनेकडेच; अध्यक्षपदावरून रंगणार चुरस

संबंधित बातम्या