सातारा:रब्बी हंगामातील पिकांच्या तयारीसाठी साताऱ्यातील शेतकरी सज्ज झाला असून, शहरातील प्रमुख भाजी मंडई आणि सदाशिव पेठ परिसरात कांदा रोपांची (तसेच मिरचीच्या रोपांची) मोठी आवक झाली आहे. सध्या बाजारात सर्वत्र हिरवीगार कांदा रोपे लक्ष वेधून घेत असून, खरेदीसाठी शेतकऱ्यांची झुंबड उडत आहे.
दरवर्षी जानेवारी महिन्यात नव्या लागवडीसाठी कांदा रोपांना मोठी मागणी असते. यंदाही हे चित्र कायम असून, सातारा शहरातील सदाशिव पेठ परिसरात विक्रीसाठी कांदा रोपांचे मोठे ढीग लागले आहेत. स्थानिक शेतकऱ्यांसह आजूबाजूच्या खेड्यातून आलेले कांदा उत्पादक शेतकरी दर्जेदार रोपांच्या शोधात मंडईत गर्दी करत आहेत.
विशेष म्हणजे, कांद्यासोबतच मिरचीच्या रोपांचीही लक्षणीय आवक झाली आहे. चांगल्या प्रतीची रोपे मिळवण्यासाठी शेतकरी सकाळीच बाजारात दाखल होत आहेत. हवामान अनुकूल असल्याने आणि पाणीसाठा उपलब्ध असल्याने यंदा कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला असल्याचे चित्र या गर्दीवरून स्पष्ट होत आहे. व्यापारी आणि विक्रेते यांच्यातही यामुळे उत्साहाचे वातावरण आहे.