सातारा : सातारा शहरामध्ये नशेसाठी वापरण्यात येणारे ड्रग्ज इंजेक्शचा सातारा शहर डीबीने कारवाई करत रॅकेटचा पर्दाफाश केला. यामध्ये एकूण 5 आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून एकूण 5 लाख 15 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ड्रग्ज इंजेक्शन रॅकेट प्रकरणी शिवराज पंकज कणसे वय 24 रा. हिल टॉप सोसायटी, शाहुनगर, गोडोली, सातारा, साईकुमार महादेव बनसोडे वय 25 रा. भोसे ता. पंढरपूर जि. सोलापूर, सुदीप संजय मेंगळे वय 19 रा. कोयना सोसायटी, सदरबझार, सातारा, अतुल विलास ठोंबरे वय 20 रा. झेड. पी. कॉलेनी, शाहुपूरी सातारा, तय्यब हाफीस खान वय 23 रा. बांगूरनगर, गोरेगाव, मुंबई या पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर परिसरातील चारभिंती, सदरबझार परिसरामध्ये काही महिन्यांपासून नशेसाठी वापरण्यात येणारे ड्रग्ज इंजेक्शन आढळून आले होते. त्याअनुषंगाने सातारा शहर डी. बी पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना याबाबत माहिती घेवून त्यांचेवर कारवाई करण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे सातारा शहर डी.बी. पथक नशा करणार्या युवकांवर गेल्या दोन महिन्यापासून लक्ष ठेवून होते. परंतु युवक हा आपण सापडू नये याकरिता आपले नाव व ओळख समोर येवू नये. याबाबत अत्यंत दक्षता बाळगत होता. परंतू डी.बी. पथकाने सलग दोन महिने चिकाटीने गोपनीय माहिती मिळवून सदर माल सातारा शहरामध्ये पुरविणार्या युवकाची माहिती मिळवली.
परंतू तो युवक अत्यंत चातुर्यानेया मालाची चोरटी विक्री करीत असल्याचे समजून आले. त्याच्या हालचालीबाबत सातत्याने लक्ष ठेवून व तांत्रिक माहिती प्राप्त करून तो दि. 2 मे रोजी तो चारभिंती परिसरामध्ये माल विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती समजून आल्याने पोलीसांनी चारभिंती परिसरामध्ये सापळा रचला होता. मिळालेल्या माहितीप्रमाणे संबंधित युवक हा चारभिंती परिसरामध्ये एका बंद टपरीच्या आडोशास संशयास्पदरित्या आढळून आल्याने त्यास पोलीसांनी ताब्यात घेतले. त्याचे नाव गाव याबाबत माहिती घेवून त्याच्या गाडीची व त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे नशेसाठी वापरण्यात येणार्या इंजेक्शनच्या बेकायदेशीर 30 बाटल्या मिळून आल्या. त्याच्याकडे या बाटल्या विषयी चौकशी केली असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास अटक करून त्याची पोलीस रिमांड घेवून त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने हे इंजेक्शन मुंबई येथून एका युवकाकडून चोरटया पद्धतीने खरेदी करीत असल्याचे सांगितले व ते प्राप्त झाल्यावर त्याने अन्य साथीदारांना ते थोड्या थोड्या प्रमाणात देवून त्याचा सप्लाय नशा करणार्या युवकांकडे चोरून पोहच करीत असल्याचे सांगितले. हा माल पोहच करित असताना तो सहजासहजी कोणाच्या समारे येत नव्हता. त्याच्या विश्वासू लोकांनाच याची माहिती देत होता. सप्लाय करणार्या तीन युवकांना देखील पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्यापैकी एकजण शिकाऊ डॉक्टर असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या चारही युवकांना अटक करण्यात आलेली आहे. मुंबई येथून ज्या ठिकाणाहून सप्लाय होत होता, तेथील युवकाचा पोलीसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेवून त्या युवकास ताब्यात घेतले. हा युवक देखील चोरटया पद्धतीने थोड्या थोड्या प्रमाणात हा माल प्राप्त करीत असल्याचे समजून आले. त्याचेकडून देखील संबंधित इंजेक्शनच्या 30 बाटल्यांचा साठा मिळून आल्याने त्यास देखील ताब्यात घेवून अटक करण्यात आलेली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सुरू असून या गुन्ह्यामध्ये अद्यापपर्यंत एकूण 5 लाख 15 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
या कारवाईत पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय अधिकारी राजीव नवले, वरीष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक श्याम काळे, पोलीस उपनिरीक्षक डी. एस. देवकर, सुधीर मोरे, पो. हवा. निलेश यादव, सुजीत भोसले, निलेश जाधव, विक्रम माने, पो.ना. पंकज मोहिते, पो. कॉ, इरफान मुलाणी, तुषार भोसले, सागर गायकवाड, सचिन रिटे, संतोष घाडगे, विशाल धुमाळ, मच्छद्रिंनाथ माने, सुशांत कदम, सुहास कदम यांनी सहभाग घेतला.