कोरेगाव शहरातील सज्जनपुरा वसाहतीत घरफोडी; पावणे तीन लाखांचा ऐवज लंपास

by Team Satara Today | published on : 03 May 2026


कोरेगाव : कोरेगाव शहरातील सज्जनपुरा या उच्चभ्रू वसाहतीत मोठी घरफोडीची घटना घडली. चोरट्याने बंद घर फोडून तब्बल 2 लाख 80 हजार 600 रुपयांचा ऐवज लंपास केला. दरम्यान, चोऱ्यांच्या वाढत्या घटनेने कोरेगाव शहर परिसरात घबराटीचे वातावरण आहे.

नामदेव चंद्रकांत भुतकर यांनी फिर्याद दिली आहे. ते 27 एप्रिल रोजी रात्री साडे अकरा वाजता सातारा येथील खाजगी कंपनीमध्ये आपल्या नाईट ड्युटीसाठी घराबाहेर पडले. त्यावेळी घरातील सर्व साहित्य व्यवस्थित होते. त्यांच्या पत्नी व मुले घरात झोपलेली होती. पहाटे सुमारे साडे चार वाजता मुलगी श्रावणी झोपेतून उठल्यावर किचनचा मागील दरवाजा उघडा असल्याचे व लोखंडी कपाट फोडलेले असल्याचे तिच्या निदर्शनास आले. तिने तत्काळ आईला जागे केले व नंतर भुतकर यांना फोन करून घटनेची माहिती दिली.

बेडरूमच्या खिडकीचे ग्रील तोडून चोरट्याने घरात प्रवेश केल्याचे स्पष्ट झाले. घरातील कपाटे उघडून सर्व साहित्य अस्ताव्यस्त करण्यात आले होते. तपासणीदरम्यान सोन्याचे मंगळसूत्र, दोन चेन, दोन अंगठ्या, कानातील दागिने, चांदीचे ताट, वाटी, देवांच्या मूर्ती तसेच 11 हजार 600 रुपये रोख रक्कम असा एकूण दोन लाख 55 हजार 600 रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याचे उघड झाले.दरम्यान, याच परिसरात राहणारे दत्तात्रय दादासाहेब कोकरे यांच्या घरासमोरील पार्किंगमधून मोटारसायकल चोरीस गेल्याची बाबही समोर आली आहे. त्यामुळे या संपूर्ण घटनेत एकूण दोन लाख 80 हजार 600 रुपयांचे नुकसान झाले आहे.

याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक ओंकार भेगडे तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कराडमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे सुसज्ज कार्यालय साकारणार; आमदार अतुल भोसले यांची माहिती
पुढील बातमी
कोरेगाव तालुक्यात पाणीटंचाई टाळण्यासाठी प्रभावी नियोजन; आमदार महेश शिंदे यांची माहिती

संबंधित बातम्या