कास : सातारा जिल्ह्याच्या पर्यटनाचा मुकुटमणी असलेल्या कास पठाराच्या यावर्षीच्या हंगामाची सुरुवात गुरुवारपासून करण्यात येणार आहे. याबाबतचा सविस्तर आढावा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आपल्या कार्यालयात नुकताच घेतला. त्यानंतर श्री. पाटील यांनी कास पठारावर जाऊन पाहणी केली.
यामध्ये कासच्या हंगामाच्या नियोजनाच्या दृष्टीने विविध विषयांवर चर्चा झाली. यात प्रामुख्याने सुटीच्या दिवशी होणारी वाहतूक कोंडी, त्यामुळे पर्यटकांना होणारा त्रास विचारात घेऊन एकेरी वाहतुकीच्या पर्यायावर चर्चा झाली. बैठकीसाठी उपवनसंरक्षक अमोल सातपुते, विभागीय वन अधिकारी रेश्मा व्होटकरे, सहायक वनसंरक्षक एच. डी. जगताप, सातारा व जावळी वनक्षेत्रपाल संदीप जोपळे, पोलिस उपनिरीक्षक संजय जाधव, कास पठार कार्यकारी समितीचे अध्यक्ष संतोष आटाळे, उपाध्यक्ष विजय वेंदे आदींसह समितीचे सदस्य प्रदीप कदम, दत्ता किर्दत, विठ्ठल कदम, विमल शिंगरे, तानाजी आटाळे, सोमनाथ बुढळे उपस्थित होते.
कासचा हंगाम चार सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार असल्याने आगामी बुकिंग www.kas.ind.in या वेबसाइटवर सुरू करण्यात आले आहे. यावर्षी सुटीच्या दिवशी फक्त ऑनलाइन बुकिंग करून येणाऱ्या पर्यटकांनाच प्रवेश मिळणार आहे. ऑफलाइन येणाऱ्यांना प्रवेश मिळणार नसल्याने आगाऊ बुकिंग गरजेचे आहे. यासाठी प्रतिव्यक्ती १५० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. गाइड फी दोनशे रुपये असणार आहे. पार्किंग ते पठारापर्यंत पर्यटकांची ने-आण करण्याकरिता बस सुविधा समितीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. यावर्षी पठारावर पर्यटकांचा उपद्रव नियंत्रित करण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे. फुलांची नासधूस व इतर उपद्रव करणाऱ्यांना उपद्रव शुल्क आकारण्यात येणार आहे.
यावर्षी स्वच्छतागृहांची संख्या ही वाढविण्यात आली आहे. पिण्याचे पाणी, प्राथमिक उपचार सुविधा, व्यवस्था पाहण्यासाठी स्वयंसेवक नेमणूक आदी बाबींची ही व्यवस्था करण्यात आली आहे.
कास हंगामाच्या तयारीबाबत विविध विभागांतील अधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आज कास पठाराचा दौरा केला. त्या वेळी पर्यटक कास पठार, तलाव पार्किंगवरून पुढे अंधारी कोळघर सह्याद्रीनगरमार्गे मेढा- सातारा किंवा कास तलाव- वाजुंळवाडी- घाटाई मार्गे पुनः सातारा असा एकेरी वाहतुकीचा मार्ग निश्चित करण्यात आला. घाटाई मार्गावर वांजुळवाडी गावच्या हद्दीत रस्ता खचला असून याठिकाणी हा रस्ता दुरुस्त करण्याच्या सूचना वनविभाग व बांधकाम विभागाला दिल्या. खड्डे तत्काळ भरावे अशा सूचना वनविभाग, बांधकाम विभाग व कार्यकारी समितीला दिल्या. पठारावरील पर्यटक व इतर सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिस बंदोबस्त दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी अमोल सातपुते, संदीप जोपळे, समाधान वाघमोडे, उज्वला थोरात, प्रदीप कदम, दत्ता किर्दत, संतोष काळे, सोमनाथ बुढळे उपस्थित होते. यावेळी कुमुदिनी तलाव, कासाणी व कास तलावाजवळील पार्किंग, कास पठार आदींची पाहणी करत जाताना घाटवण येथील घाटाई देवीचे त्यांनी सपत्नीक दर्शन घेतले.