अभिजित दिपके यांनी उपोषण सोडले, मोर्चा संसदेकडे जात असतानाच घेतला मोठा निर्णय, सरकार चर्चेला तयार, कॉक्रोज जनता पार्टीचा दावा

by Team Satara Today | published on : 20 July 2026


दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत कॉक्रोज जनता पार्टीने राजधानी दिल्लीत सुरू केलेले आंदोलन अधिकच तीव्र झाले आहे. तसेच आज आंदोलकांकडून संसदेवर मोर्चाही काढला जात आहे. दरम्यान, केंद्र सरकारविरोधातील हे आंदोलन अधिकच  तीव्र झालेले असतानाच कॉक्रोज जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दिपके यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. तसेच सोनम वांगचूक यांना ताब्यात घेतल्यापासून सुरू केलेलं उपोषण मागे घेतलं आहे.

नीट परीक्षेत झालेल्या पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रातील अनागोंदी कारभाराविरोधात आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण करत असलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना पोलिसांनी शनिवारी सकाळी नाट्यमय घडामोडींनंतर ताब्यात घेतले होते. तसेच त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर संतप्त झालेल्या अभिजित दिपके यांनी स्वत: उपोषणाला बसण्याची घोषणा केली होती. मात्र आज आंदोलन अधिकच तीव्र झालेलं असताना अभिजित दिपके यांनी उपोषण सोडण्याची घोषणा केली आहे. सोनम वांगचूक यांनी केलेल्या विनंतीनंतर अभिजित दिपके यांनी उपोषण सोडल्याचे सांगण्यात येत आहे.

आंदोलकांची संसदेकडे कूच

नीट परीक्षेतील पेपरफुटी आणि शिक्षणक्षेत्रातील अनागोंदी विरोधात आंदोलन करत असलेल्या कॉक्रोज जनता पार्टीच्या आंदोलकांच्या मोर्चाने संसदेच्या दिशेने कूच केली आहे. हा  मोर्चा संसद भवनाजवळ थोड्याच वेळात दाखल  होणार आहे. यादरम्यान, आंदोलकांना रोखण्यासाठी संसद भवन आणि आसपासच्या परिसरात कडेकोड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

सरकार चर्चेला तयार, कॉक्रोज जनता पार्टीचा दावा

दरम्यान,  केंद्र सरकार आमच्याशी चर्चेस तयार झाले आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकारचे मंत्री जे. पी. नड्डा यांच्यासोबत सीजेपी प्रतिनिधींची महत्त्वाची बैठक होणार आहे, असा दावा कॉक्रोज जनता पार्टीकडून करण्यात आला आहे. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
डॉक्टरांचा राज्यव्यापी बंद तात्पुरता स्थगित; मागण्या मान्य न केल्यास ९ ऑगस्टपासून बेमुदत आंदोलनाचा आयएमएचा इशारा
पुढील बातमी
संसद भवनाचे गेट बंद केले, जवान बंदुका रोखून सज्ज; कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला देशभरातून विद्यार्थ्यांचे समर्थन

संबंधित बातम्या