सीसीटीव्ही फोडून शेडमधील सोळा बकऱ्यांची चोरी

by Team Satara Today | published on : 13 January 2025


कराड  : कटावणीच्या साह्याने शेडचे कुलूप तोडून शेडमधील एक लाख ६५ हजार रुपये किमतीच्या १६ बकऱ्या चोरीला गेल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. शनिवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास चोरट्यांनी सीसीटीव्ही फोडून मध्यरात्रीच्या सुमारास बकऱ्या चोरीला नेल्या. सीसीटीव्ही फोडतानाची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा नोंद झाला नव्हता.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की इजाज गुलाब पटेल (वय ३९, रा. मुळीक चौक, कराड) यांचे ढेबेवाडी फाट्यावर पटेल मटण शॉप नावाचे दुकान आहे. दुकानासमोरील अपार्टमेंटच्या मागे बकऱ्यांसाठी शेड केले आहे. शेडमधून बकरे आवश्यकतेनुसार दुकानात आणतात. शनिवारी रात्री ते दुकान व शेड बंद करून घरी गेले.

दरम्यान, अपार्टमेंटसमोरील सलूनच्या दुकानावर असलेल्या सीसीटीव्ही फोडताना चौघे जण कैद झाले आहेत. मध्यरात्री त्यांनीच बकरी चोरी केल्याचे पटेल यांनी सांगितले. पटेल यांनी आज सकाळी आठच्या सुमारास दुकान उघडून शेडमधून बकरी आणण्यासाठी गेले असता शेडचे कुलूप तोडून दरवाजा उघडा असल्याचे निदर्शनास आले. शेडमध्ये एकही बकरी त्यांना दिसली नाही. एक लाख ६५ हजार रुपये किमतीच्या १६ बकऱ्या चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी शहर पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
लोकसहभागाशिवाय गावाला गावपण नाही : मंत्री जयकुमार गोरे
पुढील बातमी
सर्वसामान्यातील असामान्य लोकांच्या कथांनी श्रोते भारावले !

संबंधित बातम्या