सातारा : सातारा पालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी खासदार तथा सातारा विकास आघाडीचे खंदे समर्थक वसंत लेवे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे साताऱ्यात बंडखोरीचे वादळ मोठ्या प्रमाणावर येणार असल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, सातारा विकास आघाडीसह नगर विकास आघाडीच्या अनेक इच्छुक उमेदवारांनी महाविकास आघाडी ( तिसरी आघाडी) शी संपर्क साधण्याचे वृत्त असून ही तिसऱ्या आघाडी वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्यामुळे येत्या काही काळात बंडखोरीचे वादळ कोणाला धक्का देणार हे स्पष्ट होणार आहे.
जिल्ह्यामध्ये सातारा, कराड, मलकापूर, रहिमतपूर, म्हसवड, फलटण, वाई, पाचगणी आणि महाबळेश्वर या ९ नगरपालिकांसाठी तर मेढा येथील एका नगरपंचायतीसाठी निवडणूक होत आहे. सातारा नगरपालिकेची निवडणूकीला खा. उदयनराजे भोसले आणि बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे दोन्ही भाजपाचे नेते एकत्रित सामोरे जाणार असले तरी १ नगराध्यक्ष आणि ५० नगरसेवक पदांसाठी इच्छुकांनी मोठ्या संख्येने मुलाखती दिल्या असल्यामुळे भाजप व नेत्यांपुढे उमेदवार निवडीचा फार मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यातच ५० पैकी काही प्रभागांमध्ये आरक्षण पडल्यामुळे तत्कालीन नगरसेवक हवालदिल झाले आहेत. सातारा शहरातील प्रभाग क्रमांक ११ मध्ये सातारा विकास आघाडीचे नेते उदयनराजे भोसले यांचे खंदे समर्थक वसंत लेवे हे गेले अनेक वर्ष नगरसेवक राहिले आहेत. याच प्रभागामधून नगरविकास आघाडीचे नेते शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक अविनाश कदम यांनीही उमेदवारीसाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले असल्याने विकास कामांच्या जोरावर बुधवारी वसंत लेवे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. वसंत लेवे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून सातारा विकास आणि नगर विकास आघाडीसमोर एक आव्हान निर्माण केले आहे.
आपापल्या कालावधीत प्रभागामध्ये केलेली विकास कामे, नेत्यांप्रती एकनिष्ठपणा, प्रभागामधील जनसंपर्क याच्या जोरावर अनेक माजी नगरसेवकांनी गेल्या चार वर्षांमध्ये आपापल्या प्रभागात स्वतःचा स्वतंत्र गट निर्माण केला आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत दोन्ही राजांचे झालेले मनोमिलन पाहता सातारा नगरपालिकेची निवडणूक सुद्धा मनोमिलनातूनच भाजपच्या झेंड्याखाली लढवली जाणार ही शक्यता गृहीत धरून अनेक नगरसेवकांनी स्वतःची स्वतंत्र व्होट बँक निर्माण करत उमेदवारी देण्यात डावलले गेल्यास अपक्ष अथवा अन्य पर्यायांचा विचार करून ठेवला असल्याचे वसंत लेवे यांच्या दाखल केलेल्या उमेदवारी अर्जावरून स्पष्ट होत आहे. सातारा विकास आघाडीच्या वाट्याला २५ तर नगर विकास आघाडीच्या वाट्याला २५ जागा आल्या तरी इच्छुक उमेदवारांची संख्या शेकडोच्या घरात असल्यामुळे जिल्ह्यात सर्वाधिक बंडखोरी सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी होईल अशी चिन्हे निर्माण झाली आहेत. बंडखोरीचे लोन थोपवता आले नाही तर त्याचा मोठा फटका भाजपला बसू शकतो, अशी शक्यता निर्माण झाली आहे.
सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने वेगाने पावले उचलली असतानाच आ. शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी (तिसरी आघाडी) अत्यंत सावध पावले टाकत आहे. सातारा विकास आणि नगर विकास आघाडीमध्ये होणाऱ्या बंडखोरीनंतरच महाविकास आघाडी आपले पत्ते ओपन करणार असल्याचे सध्यातरी दिसून येत असल्यामुळे देरसे आये मगर दुरुस्त आहे, असे म्हणत महाविकास आघाडीने नाराज झालेल्या बंडखोर उमेदवारांना आपल्या कंपुत दाखल करून घेतल्यास सातारा नगरपालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीची होऊ शकते, असे राजकीय धुरीणींचे मत आहे.
भाजपाच्या "त्या" नगरसेवकांचे भवितव्य रामभरोसे
सातारा नगरपालिकेसाठी यापूर्वी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या कमळ चिन्हावर ५ उमेदवार निवडून आले होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी आपापल्या प्रभागांसह शहराच्या विकासात योगदान देण्याचा प्रयत्न केला होता. भाजपाच्या त्या पाच उमेदवारांना पुन्हा संधी मिळणार का? याबाबत अद्याप पक्षाने कोणतीही स्पष्ट भूमिका घेतली नसल्यामुळे ' त्या' नगरसेवकांचे भवितव्य आता तरी रामभरोसे असल्याचे अधोरेखित होत आहे.