अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारक यादीत ना. मकरंद पाटील यांचा समावेश

by Team Satara Today | published on : 13 November 2025


सातारा : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी आज मुंबई येथून जाहीर करण्यात आली असून त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात २०२३ मध्ये पडल्यानंतर अजित पवार भाजपासोबत जात सत्तेमध्ये उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यानंतर अजित पवार यांनी वाई- महाबळेश्वर- खंडाळा विधानसभा मतदारसंघाचे आ. मकरंद पाटील यांची मदत व पुनर्वसन मंत्री म्हणून वर्णी लावली. त्यानंतर काही कालावधीतच त्यांचे बंधू सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांची खासदारपदी नियुक्ती केली.

दोन महत्त्वाची पदे दिल्यानंतर अजित पवार यांनी या दोन्हीही पाटील बंधूंना सातारा जिल्ह्यात अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यविस्तार मोठ्या प्रमाणावर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. राज्यभरासह सातारा जिल्ह्यात मे महिन्यापासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर नुकसान भरपाई मिळावी यासाठी मकरंद पाटील यांनी मोलाची भूमिका बजावली होती.

दरम्यानच्या काळात राज्यभरातील नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुका लागल्या. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील ९ नगरपालिकांचा समावेश आहे. निवडणुकीची धामधूम सुरू असताना शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष सुनील माने यांना दोन्हीही पाटील बंधूंनी आपल्या गळाला लावून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सुनील माने यांचा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश कार्यक्रम घेतला होता.

दरम्यान गुरुवारी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीसाठी स्टार स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री धनंजय मुंडे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम, माजी मंत्री अनिल भाईदास पाटील, माजी मंत्री संजय बनसोडे, आमदार प्रताप पाटील - चिखलीकर, माजी मंत्री नवाब मलिक यांचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात बंडखोरीचे वादळ कोणाला धक्का देणार? ; वसंत लेवे यांनी कोंडी फोडली, तिसरी आघाडी वेट अँड वॉचच्या भुमिकेत

संबंधित बातम्या