उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतात झाडांची केली लागवड ; १०५ गावांच्या प्रतिनिधींना भेटून मुंबईला रवाना

by Team Satara Today | published on : 23 February 2026


सातारा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवस विश्रांतीसाठी दरे (ता. महाबळेश्वर) गावी आले असून आज त्यांनी सकाळीच आपल्या शेतात फेरफटका मारत वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची लागवड केली. यावेळी शेती, पर्यटन व विरोधक आदी विषयांवर त्यांनी माध्यमांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.

शेतात काम करतच पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मी गावी आलो की विरोधकांना पोटशूळ उठतो. त्यांच्यासाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आहे. तिथे त्यांनी जाऊन मोफत उपचार करावा. मी मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांना पोटदुखी झाली आहे. त्यांची पोटदुखी काय राहतच नाही, मी माझं काम करत राहतो. मी त्यांच्याकडे लक्ष देत नाही. मी गावी आलो की लोकांना भेटतो, शेतात जातो, हजारो लोक या ठिकाणी कामे घेऊन येतात त्यांची कामे मार्गी लावतो. या ठिकाणी वेगवेगळे प्रयोग करतो. त्यामुळे आगामी काळातही अनेक गोष्टी या ठिकाणी करणार असून कोणाच्या कितीही पोटात दुखलं तरी चालेल, असे शिंदे शेवटी म्हणाले.

पर्यटन वाढीसाठी आपण पश्चिम महाराष्ट्र ते कोकणाला जोडणारा रस्ता तसेच त्यावरील तापोळा व अहिर पूल, आपटी ते तापोळा पूल करत आहोत. या परिसरात मुनावळेला वॉटर स्पोर्ट्स करत आहोत. वासोटा किल्ला, मकरंदगड, प्रतापगड हे किल्ले जवळच आहेत. उतेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. निसर्गाचे वरदान लाभलेला हा सर्व परिसर असून होम स्टे, टेन्ट आधीच्या माध्यमातून लोकांच्या राहण्यासाठी सोय करण्याबरोबरच स्थानिकांचा पर्यटन विकास साधून येथील तरुण शहरांकडे न जाता गावातच राहून रोजगार मिळाला पाहिजे हा आमचा संकल्प आहे.


येथील शेतकऱ्यांची समूह शेती विकसित व्हावी म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत. वृक्षारोपणाच्या माध्यमातून या निसर्गरम्य परिसराचे सौंदर्य वाढवून येथील पर्यटनाला चालना देण्याचा आमचा हेतू आहे. अतिवृष्टी व इतर पर्यावरणविषयक प्रश्न सोडवण्यासाठी वृक्ष लागवड हाच एकमेव पर्याय आहे. त्यासाठी सर्वांनी वृक्ष लागवड केली पाहिजे असे मी आवाहन करतो.


आज मी इथे आलो तर एवोकाडोची झाडे लावली आहेत. एवोकाडो हे एक पौष्टिक फळ आहे. याच्यातून शेतकऱ्याला चांगले पैसे मिळतील. या परिसरात सफरचंद, आंबा, फणस, काजू, जांभूळ, बांबू, आगरवूड, काॅफी, रक्तचंदन इत्यादी वेगवेगळ्या प्रकारची शेकडो झाडे लावली असून या परिसरात ती झाडे नेमकी कशी येतात हे पाहून या परिसरातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा, असेही ते म्हणाले. परिसरातील १०५ गावांच्या प्रतिनिधींना भेटून मुंबईला रवाना झाले.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
फलटण तालुक्यातील सोमंथळीतील करंज ओढ्यावरील नव्या पुलाचा स्लॅप कोसळला; ठेकेदाराच्या निकृष्ट कामावर नागरिकांचा संताप
पुढील बातमी
महाराष्ट्रात प्रथमच पॅराग्लायडिंग वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार सुरू ; जागतिक स्पर्धेमुळे पाचगणीच्या साहसी पर्यटनाला जागतिक स्तरावर नवे पंख

संबंधित बातम्या