पुणे : मंत्री चंद्रकांत पाटील आणि पुणे महानगरपालिकेच्या एका महिला नगरसेविकेबाबत यूट्यूबवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी अटकेत असलेले संतोष गजानन पंडित (रा. नारायण पेठ, पुणे) यांची अखेर पुणे सत्र न्यायालयाकडून जामिनावर सुटका झाली आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना संतोष पंडित यांनी संपूर्ण प्रकरणावर सविस्तर भाष्य केले. "कोठडीत असताना हे सर्व सोडून देण्याचा विचार मनात आला होता, पण तुरुंगातून बाहेर आल्यावर मिळालेला प्रतिसाद पाहून आता थांबणार नाही," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
एबीपी माझा वृत्तवाहिनीला संतोष पंडित यांनी मुलाखत दिली. यावेळी संतोष पंडित म्हणाले, "माझ्याकडून अनावधानाने काही अपशब्द निघाले असतील किंवा कोणाचे मन दुखावले असेल, तर मी मनापासून जाहीर माफी मागतो. मात्र, माझा कोणताही राजकीय अजेंडा नाही किंवा मी कोणत्याही पक्षाशी बांधील नाही. मी एक सर्वसामान्य 'कॉमन मॅन' आहे. समाजात हातावर मोजण्याइतकी लोक पुढे येऊन सर्वसामान्यांच्या समस्यांवर बोलतात, अशा लोकांवर सत्तेचा किंवा पोलिसी कारवाईचा दबाव टाकून आवाज दाबण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे. जनतेची साथ जोपर्यंत आहे, तोपर्यंत मी थांबणार नाही, असेही संतोष पंडित म्हणाले.
कारागृहात गेल्यावर मला समजले की, अशाच कारवायांनी अनेक सामान्य लोक तिथे अडकले आहेत. येरवडा कारागृहाची मूळ क्षमता सुमारे २ ते २.५ हजार कैद्यांची आहे, परंतु सध्या तिथे तब्बल ७ हजार आरोपी आहेत, असा दावा त्यांनी केला.
"कोथरूड पोलीस ठाण्यात लॉकअपच नाही"
पंडित म्हणाले, "कोथरूड पोलीस ठाण्यात माझ्यावर गुन्हा दाखल झाला, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या पोलीस ठाण्यात लॉकअपच नाही. माझ्यासारख्या आरोपीला ठेवण्यासाठी त्यांच्याकडे जागा नव्हती. त्यामुळे पोलिसांनी मला रोज वेगवेगळ्या ठिकाणी फिरवले. पहिल्या दिवशी येरवडा, दुसऱ्या दिवशी खडकी, तिसऱ्या दिवशी पुन्हा येरवडा आणि चौथ्या दिवशी पुन्हा खडकी पोलीस ठाण्यातील लॉकअपमध्ये ठेवले.
हे सर्व सोडून देण्याचा विचार मनात आला होता, मात्र जनतेची साथ जोपर्यंत आहे, तोपर्यंत मी थांबणार नाही; संतोष पंडित
by Team Satara Today | published on : 18 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा