वडूज : "आपले आई-वडील अत्यंत कठीण परिस्थितीतून; प्रसंगी पोटाला चिमटा काढून आपल्याला सांभाळत असतात. आपल्यासाठी हाल अपेष्टा सहन करीत असतात.त्यांना असे वाटते की माझा मुलगा अथवा मुलगी शिकून मोठे व्हावेत .संस्कारी व्हावेत .व्यसनमुक्त राहावेत. याचा विचार विद्यार्थ्यांनी करूनच प्रत्येक पाऊल उचलावे", असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते वडूज पंचायत समितीचे सांख्यिकी विस्तार अधिकारी यशेंद्र क्षीरसागर यांनी केले.
वडूज येथील छत्रपती शिवाजी हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज मधील विद्यार्थ्यांना "शिक्षण, विद्यार्थी आणि आजचा समाज" या विषयावर आयोजित केलेल्या विशेष व्याख्यानात ते मार्गदर्शन करीत होते. यावेळी प्रा. एस. एन. जाधव तसेच सामाजिक कार्यकर्ते सिद्धनाथ गोडसे उपस्थित होते. या उपक्रमाला प्राचार्य जे. एच. जाधव यांनी प्रोत्साहन दिले .
श्री क्षीरसागर म्हणाले," शिक्षण ही अत्यंत मोलाची गोष्ट असून शिक्षण जो मनापासून प्राप्त करतो तो आयुष्यात कधीच यशस्वी अथवा पराभूत होऊ शकत नाही. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, मोहम्मद पैगंबर, येशू ख्रिस्त,गौतम बुद्ध या सर्व महान व्यक्तिमत्त्वांनी देखील अभ्यासाचे महत्त्व सांगितले आहे. " असाध्य ते साध्य; करिता सायास! कारण अभ्यास तुका म्हणे" असे संत तुकाराम स्पष्टपणे आपल्या अभंगात सांगतात ."ओले मूळ भेदी खडकाचे अंग; अभ्यासाने होते कार्यसिद्धी" असे म्हणतानाच तुकोबाराय म्हणतात की कठीण खडकात सुद्धा ओले मूळ आपले अस्तित्व टिकवून ठेवते. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी अपार कष्ट घेऊन अस्तित्व टिकवावे. व्यसनापासून दूर राहावे.
समाज, देश आणि आपले कुटुंब सर्वांचा विचार करून पावले टाकावीत. संस्कारसंपन्न देश घडण्यासाठी विद्यार्थ्यांकडे संपूर्ण भारत अपेक्षेने पाहतो. याचे भान विद्यार्थ्यांनी ठेवावे. इयत्ता बारावी नंतर खूप मोठ्या संधी आहेत. त्याचे सोने करावे. योग्य मार्गदर्शन घ्यावे. संत, समाजसेवक ,समाजसुधारक यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून चौफेर वाचन करावे .विपरीत परिस्थितीत सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण घेतले .मुलींसाठी सावित्रीबाई फुले, फातिमा दीदी, महात्मा फुले यांनी आपले आयुष्य वेचले.राजर्षी शाहू महाराज यांनी प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी रक्ताचे पाणी करून आपल्याला स्वराज्य मिळवून दिले. वयाच्या केवळ 32 व्या वर्षी बलिदान करून छत्रपती संभाजी महाराज यांनी आदर्श घालून दिला. स्वातंत्र्यासाठी वयाच्या केवळ 23 व्या वर्षी भगतसिंग, सुखदेव, राजगुरू फासावर चढले. हा सर्व इतिहास विद्यार्थ्यांनी व्यवस्थित वाचावा. शिक्षक आई-वडील यांचा मान राखावा आणि उच्च ध्येय ठेवून वाटचाल करावी."
आई-वडिलांच्या अपार कष्टाची विद्यार्थ्यांनी जाण ठेवावी - यशेंद्र क्षीरसागर, वडूज येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये व्याख्यान
by Team Satara Today | published on : 05 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा