सातारा : जिल्हयाची अर्थवाहिनी आणि सर्वसामान्यांची बँक असा नावलौकिक असलेल्या जनता सहकारी बँक साताराच्यावतीने सायबर सिक्युरिटी या विषयावर कार्यशाळा आणि प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग रविवार दि. 8 डिसेंबर रोजी बँकेच्या मंगळवार पेठ शाखेतील इमारतीमध्ये सकाळी 11 वाजल्यापासून होणार असल्याची माहिती बँकेचे भागधारक पॅनेलप्रमुख, ज्येष्ठ संचालक, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन विनोद कुलकर्णी, चेअरमन अमोल मोहिते, व्हाईस चेअरमन विजय बडेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल जठार यांनी दिली.
आधुनिक बँकिग सेवेमध्ये मोबाईल बँकिंग, डिजिटल पेमेंट इत्यादी सुविधेमुळे ग्राहकांना बँकिंग, संदर्भातील कोणतेही व्यवहार हे बँकेच्या कोणत्याही शाखेत न जाता करण्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे. मात्र या सुविधेचा लाभ घेत असताना योग्य ती दक्षता घेतली नाही तर ग्राहकांचे आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे सायबर सिक्युरिटी संदर्भात जनजागृती व्हावी तसेच एटीएम सुविधा, मोबाईल बँकिंग, डिजिटल पेमेंट हे व्यवहार करताना कोणती दक्षता घ्यावी याबाबत बँकेचे सभासद, ग्राहकांकरिता विनामूल्य प्रशिक्षण वर्गाचे व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण वर्गात या विषयातील तज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत.
प्रशिक्षण, कार्यशाळा ही बँकेचे ग्राहक, सभासद यांच्यासाठी विनामूल्य असून इच्छुकांनी मात्र त्यासाठी आगाऊ नोंदणी करणे आवश्यक राहील. तरी इच्छुकांनी नोंदणी बँकेच्या सातारा जिल्हयातील 17 शाखा कार्यालयापैकी कोणत्याही नजीकच्या शाखेत भेटून अथवा प्रशासन अधिकारी महेंद्र पुराणिक यांच्या मोबाईल क्र. 7666587288 वर नोंदणी करुन प्रशिक्षण व कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन बँकेच्यावतीने करण्यात आले आहे.