सातारा : सातारा जिल्हा परिषदेतील सत्ता नाट्यात झालेली धरपकड अटकसत्र आणि धक्काबुक्की या गोंधळाचे संपूर्ण राज्यभर पडसाद उमटले आहेत. या संपूर्ण प्रकरणात अपहरणाची तक्रार झालेले जिल्हा परिषदेचे राष्ट्रवादीचे सदस्य बापू शिंदे हे स्वतः लेखी जबाब देण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात खासदार नितीन काका पाटील यांच्या समवेत हजर झाले. माझे कोणतेही अपहरण झाले नसून खोट्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे, हे संपूर्ण कटकारस्थान असून तक्रारदार मुलगा माझ्याजवळ राहत नाही, असा लेखी खुलासा शिंदे यांनी नोंदवला आहे.
दि. २० मार्च रोजी सातारा जिल्हा परिषदेत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड झाली. या निवड प्रक्रियेत सातारा पोलिसांनी जिल्हा परिषदेच्या दोन सदस्यांना राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य बापू शिंदे यांच्या अपहरण तक्रारीवरून अटक केली होती. या प्रकरणाचा जबाब स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला होता. या प्रकरणात शिंदे यांचा जबाब नोंदवण्यासाठी पोलिसांनी त्यांना हजर राहण्यासाठी सांगितले होते. त्यानुसार बापू शिंदे राष्ट्रवादीचे खासदार नितीन काका पाटील आणि काही कार्यकर्त्यांसह सोमवारी सकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर झाले. शिंदे यांचा जबाब इन कॅमेरा नोंदवण्यात आला.
या जवाबत त्यांनी असे निवेदन केले आहे की माझे अपहरण झालेले नाही असे मी लेखी दिले असतानाही कारवाई करण्यात आली. खोट्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला हे संपूर्ण एक प्रकारचे कटकारस्थान आहे. तक्रारदार मुलगा माझ्याजवळ राहत नाही आणि आमच्यात कोणताही संबंध नाही त्याने दबावाखाली तक्रार दिली असावी.
फेरनिवडीच्या संदर्भाने न्यायालयीन प्रक्रियेत दाद मागू
खासदार नितीनकाका पाटील यांनी बापू शिंदे यांचा जबाब नोंदवल्यानंतर पत्रकारांची अनौपचारिक संवाद साधला. ते म्हणाले, मतदान प्रक्रियेत काही सदस्य सहभागी होऊ नये यासाठी हेतूपूर्वक दोन वेळा गुन्हे दाखल करून संबंधित सदस्यांना अटक करण्यात आली. हा गुन्हा जबरदस्तीने दाखल करण्यात आला असून हे प्रकरण संशयास्पद आहे. पोलीस यंत्रणेचा वापर करून सदस्य फोडण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणामागील मास्टर माइंडचा शोध घेऊन त्याच्यावर न्यायालयीन चौकशी व्हावी आणि कारवाई व्हावी अशी मागणी नितीन काका यांनी केली. तसेच तक्रारदार हा शिंदे यांचा मुलगा असल्याचे सांगण्यात येत असून त्याला 24 तास पोलिसांनी ताब्यात ठेवला तर हे आरोप करण्यात आला आहे. पोलिसांची ही भूमिका चुकीची व संशयास्पद होती. राज्यात विशिष्ट राजकीय पक्षाची सत्ता येऊ नये यासाठी हे षडयंत्र रचण्यात आले असा आरोप नितीन काका पाटील यांनी केला. तसेच निवड प्रक्रियेची वैध बाजू तपासून फेरनिवडीच्या संदर्भाने न्यायालयीन प्रक्रियेत दाद मागू असेही त्यांनी स्पष्ट केले.