सातारा : जिल्हा क्रीडा कार्यालयात अधिकार्यांचा मनमानी कारभार सुरु आहे. त्यातच क्रीडा संकुलातील जलतरण तलावाची मासिक फी 800 वरून थेट 2500 करण्यात आली आहे यात अधिकारी व संबंधित ठेकेदाराचे साटेलोटे सुरु असून या कारभाराविरोधात राष्ट्रीय पदक प्राप्त खेळाडू, एनआयएस कोच सागर जगदाळे यांनी उपोषण सुरु केले आहे.
जिल्हा क्रीडा कार्यालयाचा कारभार गेल्या काही महिन्यापासून मनमानी कारभार सुरु झाला आहे. गोरगरीब खेळाडूंच्या मागण्या याठिकाणी परस्पर टाळल्या जात असून यामुळे स्पर्धकांना खेळापासून मुकावे लागत आहे. क्रीडा कार्यालयातील जलतरण तलावाचे भाडे अवघे 800 रुपये असताना ते थेट 2500 केले आहे. यात अधिकारी व ठेकेदार यांचे साटेलोटे असल्याचे समोर आले आहे. यासाठी कोणताही ठराव न घेता जलतरण पट्टूना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
परप्रांतीयांना बेकायदेशीररित्या हॉल भाड्याने देण्यात आला आहे. खेलो इंडियाला बेकायदेशीर 63 वयाचा कोच भरला असून तो बोगस खेळाडूंच्या नावे बिले काढून पैसे खात आहे. तसेच संकुलातील साहित्य बाहेर अर्ध्या किमतीत विकले जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे.