बंगळुरू : कर्नाटकातील बंगळुरू येथे महाराष्ट्रातील मुलीच्या हत्येने खळबळ माजली आहे. याठिकाणी ३६ वर्षीय आरोपी पतीने ३२ वर्षीय पत्नीची हत्या केली. या हत्येनंतर आरोपीने तिचा मृतदेह सुटकेसमध्ये ठेवला आणि घरातून पळ काढला. या आरोपीला पुण्यात अटक करण्यात आली आहे. मयत पत्नीचे नाव गौरी सांबेकर असं आहे. ती मास मिडिया ग्रॅज्युएट असून ती नोकरीच्या शोधात होती. या आरोपीचं नाव राकेश खेडेकर असं आहे. तो एका सॉफ्टवेअर कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर आहे. अलीकडेच हे दोघं बंगळुरूतील दोडुकम्मनहल्ली येथे भाड्याच्या घरात राहत होते.
माहितीनुसार, हे जोडपे मुंबईतून बंगळुरूला आले होते. ते शहरात कधी शिफ्ट झाले हे अद्याप समोर आले नाही. पत्नी गौरीची हत्या करून पती राकेश पळाला होता. बंगळुरूहून तो कारने पुण्याला पोहचला तेव्हा त्याला अटक करण्यात आली. आरोपी पतीला बंगळुरूला परत नेले जात आहे. राकेशने गुरूवारी संध्याकाळी ५.३० च्या सुमारास त्याच्या घर मालकाला फोन केला होता. काल रात्री मी माझ्या पत्नीची हत्या केली आहे आणि शहर सोडून चाललोय असं त्याने घर मालकाला सांगितले. त्याशिवाय पोलिसांना हे सांगा आणि तिच्या घरच्यांना अंत्यसंस्कार करण्यासाठी कळवा असंही आरोपीने घरमालकाला म्हटलं.
आरोपी राकेशचं फोनवरचं बोलणं ऐकून घर मालकाला धक्का बसला. त्याने तातडीने घर गाठलं तेव्हा तिथे दरवाजा बंद असल्याचं दिसले. त्याने ११२ या हेल्पलाईनवर कॉल करून पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर हुलिमावु पोलीस घटनास्थळी पोहचले त्यांनी दरवाजा तोडला तेव्हा गौरीचा मृतदेह एका ट्रॉली बॅगमध्ये ठेवल्याचं दिसून आले. त्यानंतर तातडीने पोलिसांनी राकेशचा मोबाईल ट्रेस केला. डीसीपी सारा फातिमा यांनी महाराष्ट्र पोलिसांशी संपर्क साधला. बंगळुरू पोलीस संध्याकाळच्या विमानाने पुण्यात पोहचली.
रात्री ९.३० च्या सुमारास महाराष्ट्र पोलिसांच्या मदतीने बंगळुरू पोलिसांनी राकेशला अटक केली. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. या हत्येमागचं कारण शोधलं जात आहे. विशेष म्हणजे पत्नीची हत्या केल्यानंतर राकेशने गौरीच्या आई वडिलांना फोन करून माहिती दिली. राकेश आणि गौरी यांचं २ वर्षापूर्वी लग्न झालं असून दोघेही वर्क फ्रॉम होम करायचे. लग्नानंतर काही काळातच वारंवार या दोघांमध्ये भांडणे व्हायची. अखेर या दोघांमधील वाद विकोपाला गेला आणि राकेशने गौरीला कायमचा संपवला.